राष्ट्रकुल स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या आर.एम.व्ही. गुरुसाईदत्त आणि बी. साई प्रणिथ यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. गुरुसाईदत्तने पहिल्या फेरीत थायलंडच्या बोन्साक पोन्सानावर १८-२१, २१-१८, २१-१८ असा आणि दुसऱ्या फेरीत चायनीस तायपैईच्या त्झु वेई वांगवर २१-९, २१-१३ असा विजय मिळवून मुख्य फेरीत प्रवेश केला.
प्रणिथने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या राम्सुस फ्लॅडबर्गचा १८-२१, २१-१८, २१-१२ असा पराभव केला, तर दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या झुल्फाडली झुल्कीफ्लीने ११-६ अशा आघाडीनंतर माघार घेतल्याने प्रणिथला मुख्य फेरीत स्थान मिळाले. तरुण कोना आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीनेही मुख्य फेरीत सहज प्रवेश केला.
या जोडीने सिंगापूरच्या जिआन लिआंग ली आणि जीआ यिंग क्रिस्टल वाँगचा २१-११, २१-१२ व मलेशियाच्या मोहम्मद रझीफ अब्दुल लतीफ व सन्नतासाह सानिरुचा २१-१७, २१-१७ असा पराभव केला. मात्र, अजय जयरामला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
जयरामने मलेशियाच्या डॅरेन लिव्ह्युचा २१-१३, १४-२१, २१-१७ असा पराभव केला खरा, परंतु दुसऱ्या लढतीत इंडोनेशियाच्या सिमॉन सांटोसने त्याला २१-१६, २१-१८ असे नमवले.