गुरुनाथ मयप्पन हा फक्त क्रिकेटबाबत उत्साही असल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाबरोबर होता, असे आपल्या जावयाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन म्हणत असले तरी ‘मयप्पनकडेच चेन्नईच्या संघाची सूत्रे होती ’ असे म्हणत संघाला खंदा सलामीवीर आणि धावांची ‘रनमशीन’ ही बिरुदावली मिरवणाऱ्या माइक हसीने म्हटले आहे. हसीने ही बाब ‘अंडरनेथ दी सदर्न क्रॉस’ या पुस्तकात लिहिताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 या पुस्तकामध्ये हसीने म्हटले आहे की, ‘‘ चेन्नईच्या संघाची मालकी ही ‘इंडिया सीमेंट’ या कंपनीची होती. या कंपनीचे मालक बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन होते आणि त्यांनी हा संघ चालवण्याची जबाबदारी जावई गुरुनाथ मय्यपन यांच्याकडे दिली होती. संघाचे प्रशिक्षक केप्लर वेसल्स यांच्याबरोबर मयप्पन चेन्नईचा संघ चालवत होता.’’
आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणात मयप्पन याच्यासह २१ जणांवर आरोपपत्र दाखल
 केले आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि
 संघटित गुन्हेगारीचा आरोप लावण्यात आला
आहे.
मय्यपन हा संघातील महत्त्वाची आणि गोपनीय माहिती बाहेरील काही व्यक्तींना पुरवायचा व त्या जोरावर सट्टेबाजी करायचा, असेही आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. मयप्पन आणि सट्टेबाजांशी जवळीक असलेला अभिनेता विंदू दारा सिंग यांच्यामध्ये बरेच गैरव्यवहार झाल्याचीही माहिती काही दिवसांपूर्वी प्रकाशझोतात आली होती. त्यामुळे मे महिन्यात आयपीएल सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मयप्पन आणि विंदूला अटक केली होती. त्यानंतर तो काही दिवस मुंबई पोलिसांच्या कोठडीत होता. गेल्या महिन्यात त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
एन. श्रीनिवासन आता बीसीसीआयचे अध्यक्ष असले तरी ते थेट मयप्पनला मदत करू शकत नाही. कारण सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना आयपीएलपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे.