Global Super League 2026 Final: ग्लोबल सुपर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अतिशय थरारक सामना रंगला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात गयाना अॅमेझॉन वॉरियर्स आणि सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्स हे दोन्ही संघ आमनसामने आले होते. या सामन्याचा शेवट असा होईल, असा कोणी विचारही केला नसेल. अंतिम सामन्यात जर एखाद्या संघाचा डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आणला,तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संघाचा विजय जवळजवळ निश्चित असतो. पण, या सामन्यात भलतंच घडलं. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाचा डाव अवघ्या ८५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्स संघाचा डाव अवघ्या ७९ धावांवर आटोपला. यासह थरारक सामन्यात गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने ६ धावांनी विजय मिळवला आणि जेतेपेदावर नाव कोरलं.

तर झाले असे की, या सामन्यात गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला. कारण, गयाना अॅमेझॉन वॉरियर्सच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. ४४ वर्षीय वेगवान गोलंदाज पीटर सिडल गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघावर भारी पडला. त्याच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर अवघ्या २५ धावांवर निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर अवघ्य २९ धावांवर संघातील ८ फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे आरसीबीचा सर्वात कमी धावसंख्येचा रेकॉर्ड तुटणार असं वाटत होतं. पण शेवटी ड्वेन प्रिटोरियस आणि मॅथ्यू फोर्डने महत्वपूर्ण ४१ धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या ८५ धावांवर पोहोचवली. ५० धावा होणं अवघड असताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघानेत ८५ धावांपर्यंत मजल मारली.

सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ८६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्स संघालाही चांगली सुरुवात करता आली नाही. गुडाकेश मोती आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी सुरुवातीलाच २८ धावांवर टॉप ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर ओलिव्हर पिकने एकाकी झुंज देत ३१ धावांची खेळी करुन आपल्या संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्सच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. इमरान ताहीर आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करुन सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्स संघाला विजय मिळवून दिला.

सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्सचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या १० चेंडूंमध्ये विजयासाठी अवघ्या ७ धावा करायच्या होत्या. पण नेमकं त्याचवेळी कॉलमा स्टोव्हने मॅथ्यू फोर्डच्या गोलंदाजीवर फटका मारताच वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण शिमरन हेटमायरने वेगवान थ्रो करुन त्याला धावबाद केलं आणि सॅन फ्रान्सिस्को यूनिकॉर्न्सचा संघ अवघ्या ७९ धावांवर ऑलआऊट झाला.