जिम्नॅस्टिक्स हा अतिशय आकर्षक क्रीडाप्रकार व पायाभूत खेळ आहे. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे, मात्र या खेळाडूंना प्रोत्साहनाची आवश्यकता आहे, असे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सुभेदार (निवृत्त) निर्मल मुजुमदार यांनी सांगितले.
मुजुमदार यांनी आजपर्यंत कनिष्ठ व वरिष्ठ गटात अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणाऱ्या अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या ते एक्स थ्रील संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत.
जिम्नॅस्टिक्स म्हणजे अतिशय कठीण व आव्हानात्मक क्रीडाप्रकार आहे अशी लोकांमध्ये गैरसमजूत आहे. मात्र हा खेळ अनेक क्रीडाप्रकारांसाठी पायाभूत खेळ मानला जातो. शरीरात लवचिकता निर्माण करण्यासाठी व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी हा खेळ अतिशय उपयुक्त खेळ मानला जातो. या खेळातून निवृत्त झालेल्या खेळाडूंना चांगले भवितव्य नसते असे सहसा सांगितले जाते. तथापि हे खेळाडू भविष्यात अन्य खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक्समधून निवृत्त झालेल्या अनेक खेळाडूंनी नृत्यकलेत प्रावीण्य मिळविल्याची उदाहरणे महाराष्ट्रातही आहेत असे मुजुमदार यांनी सांगितले.
अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे या खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थांचा अभाव आहे.
 तसेच आपल्याकडे सुविधांची वानवा असल्यामुळे आपले खेळाडू नैपुण्य असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षेइतकी पदकांची लयलूट करू शकत नाहीत. जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांकरिता तीन ते पाच कोटी रुपये खर्च येतो आणि शासनाने मनात आणले तर हा खर्च करणे त्यांच्या आवाक्यात आहे असे सांगून मुजुमदार म्हणाले, आपल्याकडे गरीब खेळाडूच या क्रीडाप्रकारात सहभागी होताना दिसतात. साहजिकच काही ठराविक वर्षेच ते या खेळात सहभागी होतात व कालांतराने शिक्षणास प्राधान्य देतात.