संदीप गोपाळ

ब्राझीलच्या विजयासह हैतीचं फुटबॉल वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलं. पण फिलाडेल्फिया एरिनामध्ये हैतीच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी अश्रू ढाळले नाहीत. त्यांच्या चाहत्यांनी एकत्र फेर धरत गाणी म्हटली, घोषणा दिल्या. ग्रँडये, अलासो ही प्रसिद्ध घोषणा दिली. देशातून नेपोलिअनच्या फ्रेंच आर्मीला पिटाळून लावणाऱ्या क्रांतिकारकांच्या साहसाला वंदन म्हणून त्यांनी या घोषणा दिल्या. ‘आम्ही हरलो पण आम्ही संघर्ष केला, लढलो. आम्हाला खेळाडूंचा, संघाचा अभिमान आहे. ही आमची परंपरा आहे’, असं तिशीतल्या थॉमस इहिगो या चाहत्याने सांगितलं.

‘वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी पात्र होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानेच देशवासीयांना एकत्र आणलं’. लिंबूटिंबू देश हरले की त्यांचे चाहते ज्यापद्धतीने बोलतात तसं तो बोलत नव्हता. वैयक्तिक कटू अनुभव त्याने स्वत सोसला होता. ‘संघातले खेळाडू असोत किंवा चाहते- आमच्यातल्या सगळ्यांसाठी एक गोष्ट सामाईक आहे. ते म्हणजे आम्हाला घर नाहीये. बोलताना त्यांचा आवंढा दाटून येतो. फुटबॉलने सगळ्यांना एकत्र आणलं आहे. अनेक कुटुंबांनी दशकांपूर्वी हैतीला रामराम केला. युद्धामुळे सगळ्यांचं आयुष्य हलाखीचं झालं होतं. ते सगळे आता नाचत गात आहेत. हैतीच्या संघासाठी विजयी घोषणा देत आहेत’.

थॉमसने २०२१ मध्ये हैती सोडलं. राष्ट्राध्यक्ष जोव्होनेल मोइस यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली. त्यानंतर देशातल्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला. ‘तिथे राहणं जवळपास अशक्य झालं. कधीही घराच्या दारावर थाप पडे. ते पैशांची मागणी करत. पैसे दिले नाही तर ते आमच्यावर गोळ्या झाडत किंवा घरातल्या महिला-मुलांना ओलीस ठेवत. आम्ही पोर्ट प्रिन्स या राजधानीच्या शहरातून बाहेर पडलो’, असं त्याने सांगितलं.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालानुसार १.४ दशलक्ष नागरिक विस्थापित झाले. २०,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि जवळपास तेवढेच बेपत्ता झाले. काहींनी डॉमिनिक रिपब्लिक इथे आश्रय घेतला. डॉमिनिक रिपब्लिक हा हैतीचा एकमेव शेजारी देश आहे. काहींनी सेंट निकोलस जेटीवरून समुद्रावाटे क्युबा गाठलं. तिथून अमेरिकेत प्रवेश केला. पण त्यापैकी अनेकांना अटक करण्यात आली. आता ते सगळे ग्वाटेनामो बे इथल्या कुप्रसिद्ध तुरुंगात आहेत. ‘आमच्याकडे सुदैवाने ओळखपत्रं होती, आम्ही जमैकात गेलो. पुढच्या काही वर्षात आम्ही अमेरिकेत रेफ्युजी म्हणून अधिकृतपणे प्रवेश केला’. थॉमस आणि त्याचे कुटुंबीय मियामीत स्थायिक झाले. दोन भावांच्या बरोबरीने थॉमस एक हॉटेल चालवतो.

हैतीच्या खेळाडूंना त्यांच्या मायदेशी वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धेचा एकही सामना खेळता आला नाही. त्यांचे सामने क्युराको इथे झाले. राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर विविध टोळ्यांनी देशातल्या स्टेड सायव्हिलो चार्ल्स या स्टेडियमची नासधूस केली. तिथल्या सोयीसुविधा नष्ट केल्या. तिथे खेळणं आता दुरापास्त आहे. जॉन्सन चार्ल्सने आठवण सांगितली. त्याने काही दशकांपूर्वीच हैती सोडलं. ‘ते अतिशय सुंदर स्टेडियम होतं. डेरेदार झाडांच्या आच्छादनांनी युक्त असं स्टेडियम. मी नातेवाईकांकडून ऐकलं की ९० इमारतीही उद्धस्त करण्यात आल्या. ते तिथे खेळू शकत नाहीत हे दुर्देव आहे आणि अशा भयप्रद वातावरणात कोण खेळेल?

टोळ्यांनी स्टेयिडमचा ताबा मिळवण्यापूर्वी हैतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या एका संघाला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवण्यात आलं होतं. बेलिझचा संघ हैतीच्या दौऱ्यावर होता. सशस्त्र टोळीवाल्यांनी बेलिझ संघाची बस तासभर ओलीस ठेवली. त्यांनी बेलिझच्या खेळाडूंना काहीही इजा केली नाही. बेलिझचे खेळाडू सरावासाठी देखील मैदानावर आले नाहीत. महिनाभरानंतर त्यांचा कॅनडाशी मुकाबला झाला. त्यानंतर हैतीच्या खेळाडूंना कधीही घरच्या मैदानावर खेळता आलेलं नाही.

हैतीच्या संघातील २६ खेळाडूंपैकी केवळ दहा खेळाडूंचा जन्म हैतीत झाला आहे. इतिहास लक्षात घेता ही आकडेवारी आश्चर्यचकित करणारी नाही. जगभरात विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या हैतीच्या नागरिकांमधूनच हा संघ तयार झाला आहे. १२ खेळाडूंचा जन्म फ्रान्समध्ये झाला आहे, त्यांचे पालक मूळ हैतीचे आहेत. एकाचा कॅनडात तर एकाचा स्वित्झर्लंडमध्ये. दोघांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. हैती आणि अमेरिका यांचा सॉकर ऋणानुबंध खूप जुना असा. १९५० मध्ये अमेरिकेने इंग्लंडला नमवण्याची किमया केली होती. त्यावेळी हैतीत जन्मलेल्या जो गेजन्सने दिमाखदार गोल केला होता. जो तेव्हा डिशवॉशिंगचं काम करत असे. आताच्या संघातील खेळाडूंपैकी एकजण म्हणजे वूडन्स्की पिअर हैतीतल्या एका क्लबसाठी खेळतो. सिटे सोईल हे त्याचं मूळ गाव. टोळ्यांचं सत्ताकेंद्र असलेली समुद्रालगतची वस्ती असं या परिसराचं वर्णन करण्यात येतं. ‘मी हैतीत जाऊन खेळू शकेन असं वाटलंच नव्हतं. परिस्थिती चिघळली होती. मला कुणाचाच पाठिंबा नव्हता. मी एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलो. माझी आई रस्त्यावर विविध वस्तू विकून गुजराण करत असे. माझे वडीलही अशीच कामं करायचे. फुटबॉल ही एकच चंगळ म्हणावी अशी गोष्ट आयुष्यात होती’.

२१ वर्षीय पिअर डिफेन्सिव्ह मिडफिल्डर आहे. अमेरिकेचा व्हिसा मिळणारा तो शेवटचा खेळाडू होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हैतीच्या नागरिकांना लागू असलेलं ‘टेंपररी प्रोटेक्टेड स्टेटस’ रद्द ठरवलं. कोलंबियामधल्या जिल्हा न्यायालयाने पिअरला दिलासा दिला. आता हे प्रकरण तिथल्या सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. आम्ही कुठे जायचं? भारतात- असं चार्ल्स हसत हसत म्हणतो.

असंख्य वर्ष गुलामगिरी आणि शोषण यांचा सामना केल्यामुळे हैतीच्या खेळाडूंमध्ये विजिगीषु वृत्ती आहे. गुलामगिरीची अमानुष पद्धत बंद करणारा हैती हा जगातला पहिला देश आहे. ‘आम्ही देशातल्या युरोपियनांना हाकलून लावलं. आम्ही एक छोटासा पण निग्रही देश आहोत. उद्या काय होईल याची भीती आम्हाला नाही. आम्ही आताचा क्षण जगतो. अमेरिकेने आम्हाला निघून जा सांगितलं तर आम्ही काहीतरी पर्याय शोधून काढू. एकदा तुम्ही घरापासून दूर झालात की मग नंतर कुठे राहता याला काही अर्थ उरत नाही’, असं चाहत्याने सांगितलं.

हैतीचे चाहते त्यांच्या खेळाडूंवर अपेक्षांचं ओझं लादत नाहीत. भावुक थॉमसने सांगितलं की, ‘निर्धार पक्का केलेले संघ वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पाहतात. आम्हाला आता तरी हैतीचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे हेच भारी वाटत आहे. कारण आम्ही पुढच्या कुठल्या वर्ल्डकपमध्ये खेळू ठाऊक नाही. आम्ही कुठे असू याचाच पत्ता नाही’.