इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीने पहिल्याच डावात अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. रवींद्र जडेजासह सातव्या विकेटसाठी त्याने ७७ धावांची भागीदारी रचली व इंग्लंडला पहिल्या डावात भक्कम आघाडी घेण्यापासून रोखले. पण ही खेळी साकारण्यामागे एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा फोन…

कारकिर्दीचा पहिला कसोटी सामना खेळायला मिळणार अशी वार्ता जेव्हा कानी पडली, त्यावेळी मी फार चिंतित झालो होतो. मात्र राहुल द्रविड सरांशी फोनवरून संवाद साधल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, अशी प्रांजळ कबुली भारताचा युवा फलंदाज हनुमा विहारी याने दिली. पहिल्या दिवशी मैदानावर उतरण्याअगोदर मी द्रविड सरांशी संवाद साधला. त्यांच्याशी फक्त दोन मिनिटे फोनवर बोलून माझ्या असंख्य चिंता कमी झाल्या. ते एक महान क्रिकेटपटू असून त्यांची प्रत्येक गोष्ट मी काळजीपूर्वक ऐकतो, असेही तो यावेळी म्हणाला.

‘‘त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडे कौशल्य व क्षमतेची कमी नाही. त्यामुळे तू फक्त मैदानावर जा आणि स्वत:च्या फलंदाजीचा आनंद लूट. भारत ’ संघ ते आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या माझ्या प्रवासात द्रविड सरांचा अवर्णनीय असा वाटा आहे,’’ असे विहारी म्हणाला. याव्यतिरिक्तत्याने विराट कोहलीचेही आभार मानताना कोहलीसह खेळताना तुम्हाला दडपण जाणवत नाहीअसे सांगितले.

द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली विहारी भारतीय ‘अ’ संघात खेळतो.