पीटीआय, नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने राज्यसभेच्या खासदारकीतून मिळणारे वेतन देशातील शेतकऱ्यांच्या कन्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचा सदस्य हरभजनची गेल्या महिन्यात पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर त्याने अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. ‘‘राज्यसभेचा सदस्य या नात्याने मी माझे वेतन शेतकऱ्यांच्या कन्यांचे शिक्षण आणि कल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी मी योगदान देण्याचे ठरवले असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार आहे,’’ असे हरभजनने आपल्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले.

४१ वर्षीय हरभजनने १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये हरभजनचा (७०७ बळी) दुसरा क्रमांक लागतो. त्याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो राजकारणाकडे वळला. यावर्षी मार्चमध्ये राज्यसभेवर वर्णी लागलेल्या आम आदमी पक्षाच्या पाच उमेदवारांमध्ये हरभजनचाही समावेश होता.