मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) सन्मान म्हणून १८ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना (महिला आणि पुरुष) आजीवन सदस्यत्व दिले आहे. या १८ खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे दोन भारतीय खेळाडू आहेत. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने आजीवन सदस्यत्व दिले आहे. याशिवाय इंग्लंडच्या चार, दक्षिण आफ्रिकाच्या चार, वेस्ट इंडीजच्या तीन, ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि श्रीलंका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्या प्रत्येकी एक खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार सर अॅलिस्टर कुक, इयान बेल, मार्कस ट्रेस्कोथिक आणि माजी महिला यष्टीरक्षक सारा टेलर यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये हाशिम आमला, हर्शेल गिब्स, जॅक कॅलिस आणि मॉर्ने मॉर्केल यांचा या सन्माननीय यादीत समावेश करण्यात आला आहे. डेमियन मार्टिन आणि महिला फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेल यांची ऑस्ट्रेलियासाठी निवड झाली आहे.

हेही वाचा – T20 WC: रणनीती ठरली..! भारताविरुद्ध पाकिस्तान ‘या’ प्लेईंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

या यादीत विंडीजच्या तीन खेळाडूंना सन्मान मिळाला आहे, ज्यात सध्याचे समालोचक इयान बिशप, शिवनारायण चंद्रपॉल आणि रामनरेश सारवन यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अनुक्रमे न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन अन्य देशांतील सारा मॅकग्लाशन, रंगना हेराथ आणि ग्रँट फ्लॉवर यांना सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

१०३ कसोटीत ४१७ विकेट घेत हरभजन कसोटीत भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. श्रीनाथ हा भारताच्या एकदिवसीय प्रकराताली महान गोलंदाजांपैकी एक आहे, त्याने आपल्या कारकीर्दीत ३१५ विकेट्स घेतल्या आहे. वनडेमध्ये तो भारताचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.