भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांच्यात ट्विटरवर जोरदार वाद सुरु आहेत. दोघांनी या ट्विटर युद्धात सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एकमेकांवर चिखलफेक केली. मोहम्मद आमिरच्या ट्विटपासून याची सुरुवात झाली. आमिरने एक युट्यूब क्लिप शेअर केली होती. ज्यात शाहिद आफ्रिदीने भारत-पाकिस्तान कसोटी सामन्यात हरभजन सिंगला सलग चार षटकार मारले होते. ही क्लिप शेअर करताना आमिरने कसोटी क्रिकेटमध्ये असे कसे होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यावर भज्जीने आमिरला स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली, ज्यामुळे आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

आमिरच्या ट्विटला उत्तर देताना भज्जीने लिहिले, ‘लॉर्ड्सवर नो बॉल कसा झाला? किती घेतले आणि कोणी दिले? कसोटी क्रिकेटमध्ये नो बॉल कसा असू शकतो? तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या सहकाऱ्यांना लाज वाटायला हवी, तुम्ही या सुंदर खेळाला बदनाम केले.”

भज्जीच्या या ट्विटनंतर त्याने लिहिले की, अशा लोकांशी बोलणे मला घाणेरडे वाटते. यानंतर भज्जीने त्या सामन्याची क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्याने मोहम्मद आमिरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

या दरम्यान मोहम्मद आमिरनेही हरभजनला उत्तर दिले आहे. “तू खूप मस्त आहेस, माझ्या भूतकाळाबद्दल बोलत आहेस, पण हे तथ्य बदलणार नाही की तुला आधी तीन गोष्टींचा सामना करावा लागला. आता विश्वचषक जिंकताना पहा. वॉक ओव्हर तर मिळाला नाही, जा पार्कमध्येच वॉक करा,” असे आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्सने विजय नोंदवला. त्यामुळे आता पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठणे आता जवळपास निश्चित दिसत आहे.