Harbhajan Singh Sourav Ganguly April Fool prank dressing room: भारताचा माजी आणि यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारताचे अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघाला सावरण्याचं काम सौरव गांगुलीने केलं आहे. २००० मध्ये भारतीय क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या मॅच-फिक्सिंग प्रकरणानंतर मोहम्मद अझहरुद्दीन, अजय जडेजा आणि काही इतर खेळाडूंवर कारवाई झाली. त्यानंतर गांगुलीने भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारत नव्या युगाची सुरुवात केली. आक्रमक कर्णधार म्हणून त्याने तरुण खेळाडूंना संधी दिली, संघात आत्मविश्वास निर्माण केला आणि भारतीय क्रिकेटची प्रतिमा पुन्हा उभी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे फिक्सिंगनंतरच्या काळात भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी देणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये सौरव गांगुलीचं नाव घेतलं जातं.

हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग हे व असे अनेक खेळाडू दादाच्या उर्फ सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली खेळले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत हरभजन सिंगने सौरव गांगुलीने मोठ्या भावाप्रमाणे सर्व खेळाडूंना समजून घेत सांभाळत संघाला कसं पुढे नेलं, याचा उल्लेख केला. यादरम्यान गांगुलीबरोबर केलेल्या प्रँकबद्दल पण त्याने सांगितलं.

हरभजन-युवराजने सौरव गांगुलीवर काय प्रँक केला होता?

हरभजन सिंग म्हणाला, “आम्हाला सौरव गांगुलीसारखा कर्णधार मिळाला, याचा मला खूप आनंद आहे. तो फक्त संघाचा कर्णधार नव्हता, तर आमच्यासाठी मोठ्या भावासारखा होता. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये कुटुंबासारखं वातावरण होतं आणि त्या वातावरणातून मी खूप काही शिकलो. सचिन तेंडुलकर, दादा, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांसारखे महान खेळाडू आमच्यासोबत होते. त्यांच्या योगदानाबद्दल आपण खूप कमी बोलतो. अनिल भाऊ, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जवागल श्रीनाथ यांनी तरुण खेळाडूंची विशेष काळजी घेतली.”

हरभजनने पुढे एक मजेशीर किस्सा सांगितला. “एकदा संपूर्ण संघ एकत्र बसला होता. मी आणि युवराजने दादावर एप्रिल फूलचा प्रँक करण्याचा प्लॅन केला. आम्ही एक बनावट वर्तमानपत्राची कात्रण तयार केली, ज्यातून दादाने कधीच न बोललेलं विधान केल्यासारखं दिसत होतं. त्यामध्ये दादाने म्हटलं होतं की युवी पार्टी करण्यात व्यस्त असतो, हरभजनला कोणाची काही पडली नाहीये. आशिष नेहरा आपल्याच जगात असतो. झहीर खान पण पार्टी करत असतो., दादा म्हणाला मी असं कुठे म्हणालो. युवराज त्याला प्रश्न विचारू लागला. काही वरिष्ठ खेळाडूंनाही आम्ही या प्रँकमध्ये सहभागी केलं होतं. मी म्हणालो, ‘पाजी, तुम्हीच सांगा, दादा जर खरंच असं बोलला असेल तर ते चुकीचं आहे.’ राहुल द्रविडनेही अप्रतिम अभिनय करत म्हटलं, ‘दादा, हे योग्य नाही.’”

हरभजन किस्सा रंगवत पुढे सांगितलं, “दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी प्रश्न विचारल्यावर दादा म्हणाला, ‘मी शपथ घेतो, मी असं काही बोललो नाही. जर बोललो असेन तर मी कर्णधारपद सोडेन.’ दादा सतत विचारत होता, ‘हे कुठे छापलं आहे?’ अर्थात हे सगळं आम्हीच बनवलं होतं. त्या वेळी आमच्यापैकी एक दोन जण बॅग घेऊन निघत होते, दादा अक्षरश: आमच्यामागे हात जोडत आला की अरे उद्या मॅच आहे तुम्ही काय करताय.

प्रँक उघड झाल्यानंतरचा प्रसंग आठवत तो म्हणाला, “दादाकडे पाहून मग वाटलं, अरे आपण उगीच असा प्रँक केला. त्यातून आम्हाला त्याचा स्वभाव कळला. दुसरा कुणी असता तर कदाचित रागावला असता आणि म्हणाला असता बॅगा घेऊन निघा, पण दादा आमच्यासाठी मोठ्या भावासारखा होता. तो मनाने खूप चांगला माणूस होता आणि त्याच्यामुळे ड्रेसिंग रूमचं वातावरण इतकं छान होतं की आम्ही नेहमी एकत्र असायचो.”

पुढे किस्सा सांगत भज्जी म्हणाला, “प्रँक सुरू असताना मध्येच कुणीतरी हसायला लागलं. एवढा वेळ गंभीर चेहरा ठेवणं कठीण होतं. आम्ही सगळे त्या अभिनयात इतके गुंतलो होतो की परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देत होतो. कोच जॉन राईटलाही बाहेर ठेवण्यात आलं होतं. आम्ही त्याला सांगितलं, ‘हा संघाचा विषय आहे, आम्ही सोडवतो.’ तो बाहेर फील्डिंगसाठी कोन्स घेऊन थांबला होता, पण १५-२० मिनिटे संघ आतच होता, कारण हे सगळं नाटक सुरू होतं. देवाची कृपा की शेवटी आम्ही ते थांबवलं.”

शेवटी तो म्हणाला, “अशा घटना खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्या संघाला एकत्र आणतात. क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ, ड्रेसिंग रूम कायम गंभीर नसावा. तिथे मजा, हसू आणि आनंदही असायला हवा. आनंदी ड्रेसिंग रूम ही जिंकणारी ड्रेसिंग रूम असते. एकमेकांसोबत तुम्ही जितके आनंदी असता, तितकी मैदानावरची कामगिरी चांगली होते.”