Symonds Death: मंकीगेट प्रकरणामुळे मतभेद असणाऱ्या हरभजन सिंगलाही बसला सायमंड्सच्या मृत्यूचा धक्का; म्हणाला, “तो फार…”

२ ते ६ जानेवारी २००८ दरम्यान सिडनीत खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे हरभजन सिंग-सायमंड्स यांच्यातील मतभेद समोर आलेले.

Harbhajan Singh on Andrew Symonds Death
हरभजन सिंगने ट्विटरवरुन व्यक्त केल्या भवना (Harbhajan Singh on Andrew Symonds Death)

Harbhajan Singh on Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेपटू ॲन्ड्र्यू सायमंड्सचं रविवारी रात्री अपघाती निधन झालं.  ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये कार अपघातात निधन झालं. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. सायमंडच्या अकाली निधनामुळे क्रिकेट विश्वासा मोठा धक्का बसला आहे. अनेक मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केलेली असतानाच मंकीगेट प्रकरणामुळे सायमंड्स विरुद्ध हरभजन सिंग असा वाद निर्माण झाल्याची आठवण अनेकांना सायमंड्सच्या मृत्यूच्या बातमीनंतर झालीय. दरम्यान या प्रकरणामध्ये सायमंड्सविरोधात असणाऱ्या भारताच्या माजी फिरकीपटूने म्हणजेच हरभजननेही सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्यात.

नक्की वाचा >> विश्लेषण : अँड्र्यू सायमंड्स… गुणवान, रांगडा आणि वादग्रस्त!

सायमंड्ससोबत नेमकं घडलं काय?
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिलीय. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झालाय. ऑस्ट्रेलियामधील वरिष्ठ क्रिकेट रिपोर्टर अशणाऱ्या रॉबर्ट कारडॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार टाउनस्वीलीपासून ५० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला.

क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं पण त्यांना सायमंड्सला वाचवण्यात यश आलं नाही. 

दिग्गजांकडून श्रद्धांजली
सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केलीय. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिलीय. “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा,” असं गिलेस्पीने म्हटलंय. तर दुसरीकडे अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय. हरभजननेही सायमंड्सला श्रद्धांजली वाहिलीय.

हरभजन काय म्हणाला?
“ॲन्ड्र्यू सायमंड्सच्या अकाली निधनासंदर्भात ऐकून धक्का बसलाय. तो फार लवकर गेला (आपल्याला सोडून.) सहवेदना त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत आहेत. त्याच्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना करतो,” असं ट्विट हरभजनने केलं आहे.

‘मंकीगेट’ प्रकरण  काय  होते?

हरभजन सिंग-सायमंड्स यांच्या वादावर आधारित ‘मंकीगेट’ प्रकरण तर आख्यायिका बनले आहे. २ ते ६ जानेवारी २००८ दरम्यान सिडनीला झालेल्या त्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे कवित्व अद्याप ओसरलेले नाही. हरभजनने आपल्यावर वर्णभेदावर आधारित शेरेबाजी करीत ‘माकड’ संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली. मग हा बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल हरभजनच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत सचिनची जबानी महत्त्वाची ठरली होती. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्याला पुरेशी साथ दिली नाही अशी खंत सायमंड्सला वाटत राहिली. बीसीसीआयच्या दबावामुळे हे प्रकरण गुंडाळले गेले, असेही त्याला वाटत राहिले. मात्र नंतर आयपीएलदरम्यान त्याने हरभजनशी मतभेद विसरून जुळवून घेतले हेही सत्य आहे. 

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harbhajan singh shocked with andrew symonds sudden demise pays tribute to former australia star scsg

Next Story
अॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दु:ख, म्हणाला “आमच्या दोघांच्या…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी