Harbhajan Singh Warns Ex pakistani Player: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामना अवघ्या एका दिवसावर आला आहे. या सामन्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण यापूर्वी हरभजन सिंगच्या एका व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हरभजन सिंगने युट्युबला व्हीडिओ शेअर करत माजी पाकिस्तानी खेळाडू तन्वीर अहमदची लाज काढली आहे. त्याच्या एका वक्तव्यावर हरभजन चांगलाच संतापलेला दिसला.
हरभजन सिंगने व्हीडिओच्या माध्यमातून शेवटचा इशारा दिला आहे. हरभजन या व्हीडिओच्या सुरूवातीला म्हणत आहे, “हा व्हिडिओ क्रिकेटबद्दल नाहीये. तर एका तुच्छ व्यक्तीबद्दल आहे ज्याने माझ्यावर टीका केली आहे. खरंतर मला हेच कळत नाहीये की, तो नक्की कोण आहे. पण जेव्हा जेव्हा मी पाहतो तो काही ना काही नवीन नाटकं करत असतो. तुम्हाला माहितीये का हा माणूस कोण आहे. हा कोणी तन्वीर अहमद आहे, ज्याने पाकिस्तानसाठी ३-४ सामने खेळले आहे. पण असा वागतो जसा की इमरान खान किंवा वसीम अक्रम असेल.”
हरभजन पुढे म्हणाला की, “पाकिस्तानमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू झाले, पण ते कधीही अशी वक्तव्यं करत नाहीत. मात्र तुझ्यासारखे, ज्यांची ना फारशी कारकीर्द ना मोठी कामगिरी, असे लोकच जास्त बोलतात. लाज वाटली पाहिजे तुला. मी आयएल टी-२० ही दुबईत होणारी लीग कव्हर करत होतो. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि यावर्षी भारताचेही खेळाडू होते, जसे दिनेश कार्तिक वगैरे सहभागी झाले होते. मी तिथे समालोचक/ब्रॉडकास्टर म्हणून काम करत होतो. ब्रॉडकास्टरचं काम काय असतं? तर सामनावीर ठरलेल्या खेळाडूची मुलाखत घेणं.”
हरभजन सिंग तन्वीर अहमदवर अचानक का संतापला?
तो पुढे म्हणाला, “त्यांचा एक फिरकी गोलंदाज आहे, जो थांबून मग चेंडू टाकतो. त्याने एका सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला, त्यामुळे तो ‘सामनावीर’ ठरला. अशा वेळी माझं काम त्याला खेळपट्टीबद्दल, गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारण्याचं असतं. पण मी त्याची मुलाखत घेतली म्हणून याला त्रास होतो. उलट मी मुलाखत घेतली नसती तर म्हणाला असता की तो पाकिस्तानी असल्यामुळे मुलाखत घेतली नाही.”
हरभजनने सांगितलं की त्याने माझ्याबद्दल असं म्हटलं की, “हा जिथे पाकिस्तानी खेळाडू दिसतो तिथे चिकटतो.” ए, माझं ऐक, पाकिस्तानमधील जे दिग्गज खेळाडू आहेत, ते कधीही अशी भाषा वापरत नाहीत. ते इतर खेळाडूंना आदर देतात. वसीम, वकार किंवा इतर मोठे खेळाडू कोणाबद्दल अशा पद्धतीने बोलत नाहीत. पण ज्याने आयुष्यात काहीच विशेष साध्य केलेलं नाही, तो मात्र छोट्या चॅनेलवर बसून अशा प्रकारची वक्तव्यं करतो. तन्वीर, ही बडबड बंद कर आणि आमच्याकडे बघण्याचीही गरज नाही. माझ्या नादी लागू नकोस. यावेळी मी काही बोललो नाही, पण पुढच्या वेळी मात्र तुझी चांगलीच खरडपट्टी काढेन.”

