Harbhajan Singh supports Gautam Gambhir head coach criticism PTI: भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अशी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. संघाच्या कामगिरीनंतर सामन्यांच्या निकालानंतर गौतम गंभीरला चांगलंच ट्रोल केलं जातं. गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदावरून काढावं, अशी मागणीदेखील चाहत्यांनी अनेकदा केली आहे. तर माजी खेळाडूसुद्धा गंभीरवर टीका करताना दिसला. यावर हरभजन सिंगने नुकत्याच एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने गौतम गंभीरवर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून होत असलेल्या सततच्या टीकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, कडव्या आणि अप्रिय वाटणाऱ्या सत्य गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची गंभीरची शैली प्रत्येकाला आवडेलच असं नाही, हेही त्याने मान्य केलं.
हरभजन सिंगने गौतम गंभीरबद्दल बोलताना त्याच्या जिद्दी, प्रामाणिकपणा आणि संघासाठीच्या समर्पणाचं कौतुक केलं. हरभजनच्या मते, गंभीर हा मनाने खूप चांगला माणूस असून तो नेहमी संघाला स्वतःपेक्षा वरचं स्थान देतो. अनेकांना त्याची बोलण्याची शैली कठोर वाटते, पण तो फक्त सत्य बोलतो आणि तेच काही लोकांना खटकतं, असं हरभजनने सांगितलं. क्रिकेटची त्याला उत्कृष्ट समज असून प्रशिक्षक म्हणूनही तो खेळाडूंनी जिंकण्याच्या तीव्र इच्छेसह मैदानात उतरावं अशी अपेक्षा ठेवतो.
गौतम गंभीरबाबत हरभजन सिंग पाहा काय म्हणाला?
तो म्हणाला, “जेव्हा एखादी व्यक्ती प्रशिक्षक बनते, तेव्हा साहजिकच संघाची कामगिरी खराब झाली तर प्रशिक्षकावरही दबाव येतो. गौतम गंभीर नेहमीच अत्यंत जिद्दी खेळाडू राहिला आहे. त्याने कायम संघाला स्वतःपेक्षा वरचं स्थान दिलं. फार कमी लोक त्याला जवळून ओळखतात. तो संघात आला तेव्हा फार मोजक्या लोकांशी मिसळायचा, पण ज्यांच्याशी मैत्री केली त्यांच्याशी खूप जवळचा राहिला. वीरेंद्र सेहवाग, अमित मिश्रा आणि मुनाफ पटेल हे त्याचे जवळचे मित्र होते.”
हरभजन पुढे म्हणाला, “आता तो कसा आहे हे मला माहीत नाही, पण मला आशा आहे की तो अजूनही तसाच असेल. गौतम हा मनाने खूप चांगला माणूस आहे. अनेकांना वाटतं की तो कठोरपणे बोलतो, पण प्रत्यक्षात पाहायचं तर तो जे खरं आहे तेच बोलतो आणि सत्य ऐकायला अनेकांना आवडत नाही. त्यामुळे काही लोक त्याला थोडा अहंकारी समजतात. पण माणसाचं मूल्यांकन फक्त बाह्य स्वभावावरून करू नये.”
गंभीरच्या क्रिकेट समजुतीबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्या मते गौतम अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहे आणि क्रिकेट कसं खेळलं पाहिजे याची त्याला उत्कृष्ट जाण आहे. एक गोष्ट निश्चित आहे तो जेव्हा एखाद्या संघाचा प्रशिक्षक असतो, तेव्हा खेळाडूंनी त्याच जिद्दीने खेळावं अशी त्याची अपेक्षा असते, ज्या जिद्दीने तो स्वतः खेळाडू म्हणून खेळला.”
तो पुढे म्हणाला, “त्याला संघ जिंकावा असंच वाटतं. प्रत्येक प्रशिक्षकाला विजय हवा असतो, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिंकण्याची मानसिकता. सकारात्मक क्रिकेट खेळून आणि विजयासाठी प्रयत्न करताना पराभव झाला तरी चालतो. पण विजयासाठी प्रयत्नच न करणं, अनिर्णित निकालावर समाधानी राहणं आणि योग्य हेतूचा अभाव असणं हे स्वीकारार्ह नाही. योग्य मानसिकता आणि जिंकण्याची तीव्र इच्छा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”
