scorecardresearch

‘५० लाख लोकसंख्येचा देश फुटबॉल खेळतोय आणि आम्ही हिंदू मुस्लिम खेळतोय’

सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे

फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी रंगला. फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. दरम्यान या सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. एकीकडे ५० लाख लोकसंख्येचा देश फुटबॉल वर्ल्ड कप खेळत असताना आपण हिंदू मुस्लिम खेळतोय अशी खंत त्यांने व्यक्त केलीये.

हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे की, ‘जवळपास ५०लाख लोकसंख्या असणारा क्रोएशिया फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम खेळणार आणि आम्ही १३५ कोटी लोक हिंदू – मुस्लिम खेळत आहोत #विचार बदला देश बदलेल’. हरभजन सिंगने सामन्याच्या आधी हे ट्विट केलं होतं.

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून जोरदार अॅक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या १८व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र हि आघाडी जास्त काळ टिकली नाही. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. याचा फ्रान्सने लाभ घेतला. अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी राखली. १९७४ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पूर्वार्धात ३ किंवा जास्त गोल झाले.

त्यानंतर उत्तरार्धात क्रोएशियाने आक्रमणाला सुरुवात केली. मात्र त्यांचे आक्रमण बोथट ठरले. याउलट संपूर्ण स्पर्धेत सूर हरवलेल्या पॉल पोगबा याला या सामन्यात सूर गवसला. पोगबाने ५९व्या मिनिटाला दुसऱ्या प्रयत्नात गोल केला आणि फ्रान्सला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल करत फ्रान्सच्या आनंदात भर घातली. त्यामुळे फ्रान्स ४-२ ने आघाडीवर गेले. सामन्यात पहिला आत्मघातकी ओन गोल करणारा मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला त्यापुढे जाऊ दिले नाही. अखेर रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्सने सामना ४-२ने जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harbhajan singh tweets on football final hindu muslim fight

ताज्या बातम्या