Hardik Pandya Krunal Pandya Fight Video: मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात वानखेडेच्या मैदानावर सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या डावामध्ये सर्वांच्या नजरा हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या या भावांच्या जोडीवर होत्या. दोन्ही भावंडांमध्ये चांगलंच बिनसलं असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रिपोर्ट्समध्ये येत आहे. मुंबई-आरसीबी सामन्यातही हे चित्र स्पष्ट दिसून आलं. इतकंच नव्हे तर कृणाल पंड्या हार्दिकला हात मिळवण्यासाठीदेखील गेला नाही, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई-आरसीबी सामन्यात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आमनेसामने आले होते. दोघांमधील संबंध सध्या तितकेसे चांगले नसल्याची चर्चा असून, कृणालने हार्दिकचं स्वागत थेट बाउन्सर टाकून केलं. मोठ्या भावाने त्याच्या विकेटनंतर जोरदार सेलिब्रेशन केल्यानेही या चर्चांना अधिक उधाण आलं. सामन्यानंतर दोघांनी हस्तांदोलनही टाळल्याचं दिसलं, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा अधिक स्पष्ट झाला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यात नेमकं काय घडलं?

हार्दिक पंड्या फलंदाजी करत असताना कृणाल पंड्या गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर आपल्या धाकट्या भावाला बाउन्सर टाकला, ज्यावर हार्दिकने शांत, थंड नजरेने प्रतिसाद दिला. साधारणपणे हे दोघे मैदानावर हसत-खेळत वातावरण ठेवतात आणि एकमेकांशी मजेत संवाद साधताना दिसतात. एकमेकांना मिठी मारताना गप्पा मारताना दिसता, तर षटकांदरम्यानही त्यांच्यातील मजेशीर नातं दिसून येतं.

मात्र रविवारी चित्र पूर्णपणे वेगळं होतं, सगळं काही फक्त खेळापुरतंच मर्यादित होतं. कोणतीही हलकीफुलकी चर्चा झाली नाही. हार्दिक बाद झाल्यानंतर कृणालने आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला. कृणालने उडी मारत झेल टिपलेल्या शेफर्डचं दोन वेळा कौतुक केलं. हा क्षण हार्दिक पंड्यादेखील मैदानाबाहेर जाताना पाहता होता. पंड्या ब्रदर्समधील हे क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न निर्माण झाले.

सामना संपल्यानंतर कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या यांनी ना हस्तांदोलन केलं, ना एकमेकांशी संवाद साधला. कृणाल पंड्या हस्तांदोलन करत असताना अचानक दुसरीकेडे वळला. आतापर्यंत या दोन्ही भावंडांचं नात एकदम घट्ट होतं, मात्र आता बाहेरून पाहता परिस्थिती थोडी वेगळी वाटू लागली आहे. या सामन्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं.

पंड्या ब्रदर्समध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या बातम्यांना उधाण

या अफवांना सुरुवात टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर झाली होती. या स्पर्धेत हार्दिक पंड्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचं देशभर कौतुक झालं, पण त्यावेळी त्याचा भाऊ कृणाल पंड्या आणि वहिनी पंखुरी शर्मा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं.

याशिवाय, हार्दिकने आपल्या भावाला आणि वहिनीला वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा न दिल्यानेही चर्चा रंगल्या. हार्दिकच्या नताशासोबतच्या घटस्फोटानंतर त्यांच्या एकत्र फिरण्यातही बदल दिसून आला. कृणाल त्याची पत्नी आणि आईदेखील नताशासोबत दिसले, तर हार्दिक अनेक कार्यक्रमांमध्ये गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत दिसत असल्याचं पाहायला मिळालं.