Hardik Pandya Viral Video: आयपीएल २०२६ पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. १२ कोटींच्या फरारीमधून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना त्याला पोलिसांनी अडवलं होतं. टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद पटकावल्यानंतर हार्दिकने ही कार विकत घेतली होती. आता मुंबई पोलिसांनी हार्दिकची कार तपासणीसाठी अडवल्यानंतर काय घडलं, जाणून घेऊया.

हार्दिक पंड्या आता टी-२० विश्वचषकानंतर आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्त्व करताना यंदा हार्दिककडून मोठ्या अपेक्षा असतील. मुंबई इंडियन्सचा यंदाचा संघ पाहता आयपीएल २०२६ ची सहावी ट्रॉफी मुंबईने जिंकावी, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्सच्या प्री-सीझन द मिक्स या कार्यक्रमात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं.

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे संपूर्ण संघ सध्या मुंबईत आहे. यादरम्यान हार्दिक पंड्या रात्रीच्या वेळेला त्याच्या १२ कोटींच्या फरारीमधून मुंबईत फिरत होता. त्यावेळेस मुंबईच्या रस्त्यावर पोलिस प्रत्येक कारची तपासणी करत होते. पोलिसांनी कारमध्ये कोण आहे हे पाहण्याआधीच कार थांबवली. कारची काच खाली केल्यावर आतमध्ये हार्दिकला पाहताच पोलिसही हसले आणि हस्तांदोलन ओके सर जा सर तुम्ही, असं पोलिस म्हणाले.

मुंबईत पोलिसांनी हार्दिक पंड्याची कार का थांबवली?

हार्दिक पंड्याचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. हार्दिकच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये नव्या फरारी कारची भर पडली आहे. या कारची किंमत तब्बल १२ कोटी आहे. पोलिसांनी अडवलं तेव्हा हार्दिकबरोबर कारमध्ये त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा नव्हे तर त्याचा मित्र सोबत होता. हार्दिक पंड्या त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे देखील गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

हार्दिक पंड्याने नताशा स्टँकोविकबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आता माहिका शर्मा हिच्याबरोबर तो रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. भारताचे टी-२० विश्वचषकातील सर्व सामने पाहण्यासाठी आणि हार्दिकला चिअर करण्यासाठी माहिका स्टेडियममध्ये होती. तर काही सामन्यांना माहिका हार्दिकचा लेक अगस्त्य पंड्यासोबतही दिसली होती.