Hardik Pandya Vaibhav Suryavanshi Video: वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीचं सर्वत स्तरावरून कौतुक केलं जात आहे. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडूंसमोरही वैभव सूर्यवंशी न डगमगता मोठी फटकेबाजी करताना दिसला. वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालच्या वादळी कामगिरीमुळे आणि नंतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्स संघाला हार पत्करावी लागली. सामन्यानंतर हार्दिक पंड्या वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना दिसला. ज्याचा व्हीडिओ सध्या सर्वांची मनं जिंकत आहे.
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला हरवून १३ वर्षांनंतर आयपीएल हंगामातील आपला पहिला सामना जिंकला. मात्र, त्यानंतर मुंबईने सलग दोन सामने गमावले आहेत. गुवाहाटीमध्ये यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी मुंबई इंडियन्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याचा चेहरा स्पष्टपणे निराश दिसत होता. तरीही त्याने वैभव सूर्यवंशीला भेटल्यावर त्याने त्याचं कौतुक केलं.
पावसामुळे सामना ११ षटकांचा करण्यात आला, या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील लढतीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आणि त्यानंतर त्याच षटकात आणखी एक षटकार खेचणाऱ्या सूर्यवंशीने १४ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या, ज्यामुळे राजस्थान रॉयल्सला केवळ २.४ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.
सूर्यवंशीच्या कामगिरीने प्रभावित झालेल्यांमध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंचाही समावेश होता, ज्याने सामन्यानंतर सूर्यवंशीचे विशेष अभिनंदन केलं. सामन्यानंतरच्या त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हार्दिक वैभवला मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर त्याला शाबासकी दिली. स्वत: निराश असतानाही खेळभावना दाखवत हार्दिकने केलेल्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
सामन्यानंतर सूर्यवंशीबद्दल बोलताना पंड्या म्हणाला, “१६-१७ वर्षांच्या मुलाला अशाप्रकारे खेळताना पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. शिवाय, सामन्यापूर्वीच्या तयारीदरम्यान आम्ही त्याच्याबद्दल खूप चर्चा केली होती. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतो, जसे बिनधास्त फटके फटके खेळतो, ते पाहणं खूप कमाल आहे. मी त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.”
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ११ षटकांत ३ गडी गमावून १५० धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ७७ धावांवर नाबाद परतला, तर वैभव सूर्यवंशी ३९ धावांवर बाद झाला. राजस्थानकडून नांद्रे बर्गर, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मुंबईला १२३ धावांवर सर्वबाद केलं आणि मुंबईचा संघ १२३ धावाच करू शकल्याने मुंबईने २७ धावांनी सामना गमावला.
