Hardik Pandya Bald Look and Luxury Watch Details: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या नव्या लूकसोबतच त्याच्या मनगटावर दिसलेल्या आलिशान घड्याळानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्दिकने पूर्णपणे टक्कल केलं आहे, त्याच्या या वेगळ्या अंदाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हार्दिक पंड्याच्या मनगटावर अतिशय लक्झरी रिचर्ड मिले घड्याळ असल्याचं दिसत आहे. त्याच्या या घड्याळाची किंमत ऐकून तर चक्कर येईल.

हार्दिकच्या या टक्कल असलेल्या लूकवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये त्याच्या मनगटावर दिसणारं महागडं घड्याळ चर्चेचा आणखी एक विषय ठरलं आहे. त्यामुळे हार्दिकच्या नव्या लूकसोबतच त्याच्या घड्याळाचीही सध्या चर्चा रंगली आहे.

हार्दिक पंड्याने Richard Mille RM 67-02 हे घड्याळ घातलं आहे. हे घड्याळ आपल्या स्पोर्टी डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखलं जातं. त्याचं वजन अवघं ३२ ग्रॅम आहे. टिकाऊपणा लक्षात घेऊन या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. या घड्याळात हलके Carbon TPT मटेरियल, Skeletonised Dial आणि Titanium Bridges वापरण्यात आले आहेत. त्यामुळे Richard Milleच्या घड्याळांना ओळख मिळवून देणारा खास टेक्निकल लूक त्याला मिळतो.

हार्दिक पंड्याने घातलेल्या या आलिशान घड्याळाची किंमत सुमारे ४.५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्दिकच्या नव्या लूकबरोबर त्याच्या मनगटावरील हे घड्याळही विशेष आकर्षणाचं ठरलं आहे. हार्दिकला महागड्या आणि लक्झरी घड्याळांची विशेष आवड असून, यापूर्वीही तो अनेक हाय-एंड घड्याळं घातलेला दिसला आहे. टी-२० विश्वचषकादरम्यानही हार्दिक पंड्याने घातलेली घड्याळं चर्चेचा विषय ठरली होती.

हार्दिकच्या नव्या लूकमागे आध्यात्मिक कारण

विशेष म्हणजे, हार्दिक पंड्याने केलेलं टक्कल केवळ स्टाइलसाठी केलेला बदल नाही. २ ऑगस्टला हार्दिकने तिरुमला येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्याने मंदिरातील पारंपरिक मुंडन विधी केला. यादरम्यान त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड महिका शर्माही होती. या धार्मिक विधीमध्ये भाविक भगवान वेंकटेश्वरांना आपले केस अर्पण करतात. हा विधी नम्रता, भक्ती आणि देवाप्रती समर्पणाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे हार्दिकचा पूर्णपणे टक्कल केलेला लूक हा केवळ फॅशन किंवा स्टाइलचा भाग नसून, तिरुमला मंदिरातील एका आध्यात्मिक आणि धार्मिक विधीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.