यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारताने मँचेस्टर येथील निर्णायक सामना पाच गडी राखून जिंकला. भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना या दोघांनी डावाची सूत्रे हाती घेऊन दमदार कामगिरी केली. हार्दिक पंड्याने सामन्याच्या दोन्ही डावात गोलंदाज व फलंदाजाची जबाबदारी पार पाडली. आपल्या या कामगिरीच्या बळावर त्याने विक्रमांना गवसणी घातली आहे.

भारताच्या सलामीच्या फळीने इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर माना टाकल्यानंतर पंत आणि पंड्याने डावाला आकार दिला. हार्दिक पंड्याने यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या सहकार्याने भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवले. दोघांनी मिळून १३३ धावांची भागीदारी केली. पंड्याने ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. यामध्ये १० चौकारांचा समावेश आहे. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना चार बळी देखील घेतले होते. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट सामन्यात अर्धशतक करून चार बळी मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

हार्दिक पंड्याने सात षटकात केवळ २४ धावा देत चार बळी घेतले. यादरम्यान त्याने तीन निर्धाव षटकेही फेकली. त्याने जेसन रॉय, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन या घातक फलंदाजांना बाद केले. ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारतीय संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याच्याबाबतीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – England vs India 3rd ODI : प्रतिक्षा संपली! निर्णायक सामन्यात पंतने ठोकले एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम व्यंकटेश प्रसाद यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २७ धावा देऊन पाच बळी घेतले होते. तर, मोहम्मद शमीने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात १६ धावांत चार बळी घेतले होते. या यादीमध्ये आता पंड्याचेही नाव जोडले गेले आहे.