Hardik Pandya New Car: हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ मधील सलामीचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान हार्दिक पंड्याने अजून एक नवी लक्झरी कार खरेदी केली आहे. हार्दिक पंड्याने अवघ्या सहा महिन्यांत आपली चौथी आलिशान कार खरेदी केली आहे. यावेळी त्याने नुकतीच लॉन्च झालेली कार खरेदी केली असून, ही कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. हार्दिक पंड्या आपल्या गर्लफ्रेंड माहिकासोबत कारच्या डिलिव्हरीसाठी पोहोचला होता.

हार्दिक पंड्याला लक्झरी कार आणि घड्याळांच शौक असल्याचं आपण त्याच्या कलेक्शनवरूनच पाहू शकतो. हार्दिककडे अनेक महागडी घड्याळ असल्याचं आपण सामन्यांदरम्यान पाहिलं आहे. याशिवाय त्याच्याकडे एकापेक्षा एक कमालीच्या कार आहेत. यामध्ये भारतात लाँच झालेली कोटींमध्ये किंमत असलेली कार त्याने खरेदी केली आहे.

हार्दिक पांड्याने यावेळी आपल्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लासची भर घातली आहे. विशेष म्हणजे, तो या नवीन पिढीच्या मर्सिडीज व्ही-क्लासचा मालक असलेला भारतातील पहिला व्यक्ती ठरला आहे. या आलिशान कारची किंमत अंदाजे १.४ कोटी आहे. ही कार आरामदायक कौटुंबिक प्रवासासाठी ओळखली जाते, या कारचं इंटेरियर स्पेशियस आहे, समोरासमोर सीट्स आहेत आणि हाई एंड फिचर्सदेखील आहेत.

हार्दिक पांड्याकडे आधीच अनेक महागड्या व आलिशान कार आहेत. त्याच्या अलीकडील खरेदीमध्ये, त्याने अंदाजे ४ कोटी किमतीची लँड रोव्हर डिफेंडर खरेदी करून ती आपल्या मुलाला भेट दिली. अंदाजे १२ कोटी किमतीची १२-सिलेंड्री फेरारी देखील त्याच्या कार कलेक्शनमध्ये सामील आहे. त्याने अंदाजे ४.५ कोटी किमतीची लॅम्बोर्गिनी उरुस देखील खरेदी केली आहे.

हार्दिक पंड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास कारच्या डिलिव्हरीसाठी आला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी तो महिका शर्मासोबत फेरारीच्या १२-सिलेंड्री कारमधून फिरतानाही दिसला होता.