Hardik Pandya Fan Video: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे मालिकेसाठी हार्दिक पंड्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण दुखापतग्रस्त असल्यामुळे तो या मालिकेत खेळू शकला नव्हता. ही मालिका झाल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पण हार्दिक पंड्या या संघाचा भाग नाही. मैदानावर आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हार्दिक पंड्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिकच्या एका जबरा फॅनने आपल्या आवडत्या खेळाडूची भेट घेण्यासाठी सलग १२ दिवस सायकल चालवली आणि २००० किमी इतका प्रवास केला. या भेटीनंतर हार्दिकने त्याला एक खास भेट दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचे असंख्य फॅन्स आहेत. जे आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावतात. पण काही फॅन्स खूप खास असतात, जे आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायला तयार असतात. हार्दिकने ज्या जबरा फॅनची भेट घेतली, तो १२ दिवस सायकल चालवून त्याला भेटण्यासाठी आला होता. ही भेट हार्दिकची गर्लफ्रेंड महिका शर्माने घडवून आणली. या फॅनचं नाव दिपक कुमार आहे. त्याने हार्दिकला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. महिका शर्माने दिपक कुमारच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले होते की, “बंगळुरुला ये… मी तुझी भेट करुन देते.” महिकाने दिलेला शब्द पाळला, दिपक कुमार बंगळुरुला आल्यानंतर हार्दिकने त्याची भेट घेतली आणि खास गिफ्ट दिलं.

दिपक कुमारला आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागली. त्याने हार्दिकच्या भेटीचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. दिपकने हार्दिकला जग्गनाथाची मूर्ती भेट म्हणून दिली. यासह त्याचा सत्कार केला. हार्दिकनेही त्याला रिटर्न गिफ्ट दिलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिकने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट म्हणून दिली. यासह सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, हार्दिकने त्याला १.५ लाख रुपये आणि विराट कोहलीने नुकताच लॉन्च केलेले वन ८चे शूज गिफ्ट म्हणून दिले. पण हा दावा खरा आहे की खोटा याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

हार्दिक पंड्याची भेट घेण्याआधी दिपक कुमारचे इंस्टाग्राम फॉलोवर्स खूप कमी होते. पण हार्दिकची भेट घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याचे फॉलोवर्स झपाट्याने वाढले आहेत. त्याच्या फॉलोवर्सची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.