Hardik Pandya Gave Special Gift To Wankhede Stadium Groundsman: आधी हार्दिक पंड्याला आपल्या अॅटिट्यूड आणि वागणुकीमुळे प्रचंड ट्रोल केलं जायचं. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून काढून जेव्हा हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आलं, हे क्रिकेट चाहत्यांना मुळीच आवडलं नव्हतं. २०२४ च्या आयपीएलमध्ये मुंबईत झालेला एकही सामना असा नव्हता, ज्यात हार्दिकला ट्रोल केलं गेलं नव्हतं. पण त्यानंतर टी-२० वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावून तो क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो ठरला. आता आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी त्याने मन जिंकणारं कृत्य केलं आहे.
हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, तो केवळ मैदानावर हिरो नाही, तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. सध्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृ्त्व करत असलेल्या हार्दिक पंड्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांचे आभार मानले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार त्याने सर्व सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख रूपयांचा धनादेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, त्याने प्रत्येकाला १०-१० लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर येत आहे. टी-२० वर्ल्डकप सुरू असताना त्याने ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांना वचन दिलं होतं, वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने आपलं वचन पूर्ण केलं आहे.
टी-२० वर्ल्डकप सुरू असताना हार्दिक पांड्या सामना संपल्यानंतरही रात्री १२ पर्यंत सराव करायचा. त्यावेळी ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांनी त्याला मदत केली होती. त्यावेळी त्याने ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांना वचन दिलं होतं की, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळणार. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. ही ट्रॉफी जिंकून देण्यात हार्दिक पंड्यानेही मोलाची भूमिका बजावली. गुरूवारी हार्दिकने आपलं वचन पूर्ण करत ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांचे आभार मानले.
हार्दिक पांड्याने २ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात हार्दिकने निर्णायक षटक टाकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आता हार्दिकला १० वर्षांत १० आयसीसी ट्रॉफी जिंकायच्या आहेत. हार्दिक म्हणाला, “मी अजूनही १० वर्ष क्रिकेट खेळू शकतो. माझं पुढील टार्गेट १० वर्षांत १० आयसीसी ट्रॉफी जिंकणं हेच असणार आहे.” येत्या २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हार्दिक या स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो.
