Hardik Pandya Trade Deal: आयपीएल २०२७ स्पर्धा सुरु व्हायला अजून बराच वेळ आहे. पण त्याआधी फ्रँचायझींनी आगामी हंगामाची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेआधीच ऋषभ पंत आणि कुलदीप यादव या दोघांमध्ये हाय प्रोफाईल ट्रेड झाला आहे. लखनौचा माजी कर्णधार ऋषभ पंत आपला जुना संघ दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल झाला आहे. तर कुलदीप यादव दिल्लीतून लखनौ सुपर जायंट्स संघात दाखल झाला आहे. ही ट्रेड झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धेत हार्दिक पंड्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. हार्दिक मुंबईची साथ सोडणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे. पण मुंबईची साथ सोडल्यानंतर तो कुठे जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. हार्दिकला आपल्या संघात स्थान देण्यासाठी काही संघ जोर लावताना दिसून येत आहेत. दरम्यान राजस्थान रॉयल्सनंतर आता कोलकाता नाईट रायडर्स देखील हार्दिकला आपल्या संघात स्थान देण्याच्या शर्यतीत आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या एका सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर अशी माहिती दिली आहे की, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये हार्दिकच्या ट्रेडबाबत चर्चा सुरु आहे. गेल्या हंगामानंतरही कोलकाता नाईट रायडर्सने याबाबत प्रस्ताव ठेवला होता. या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, जर हार्दिक पंड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात आला, तर त्याला कर्णधारपद दिले जाईल. श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स संघाची साथ सोडल्यानंतर या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली होती. पण, त्याच्या नेतृत्वाखाली या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

या ट्रेड डीलबाबत महत्वाची बाब म्हणजे, कर्णधारपदाच्या ऑफरसह ही ट्रेड डील पूर्णपणे कॅश डील होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता मुंबई इंडियन्स कॅश डील करणार, की खेळाडूंची अदलाबदली करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार, खेळाडू फ्रँचायझींसोबत ट्रेड डीलबाबत चर्चा करु शकत नाही. जेव्हा डील होते, तेव्हा चर्चा ही फ्रँचायझींमध्ये होते. पण खेळाडूंचा होकार मिळणंही तितकंच गरजेचं असतं.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऑफर देण्याआधी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये ट़्रेड डील होणार असल्याची चर्चा रंगली होती. हार्दिक पंड्या राजस्थानमध्ये गेल्यानंतर यशस्वी जैस्वाल मुंबईच्या ताफ्यात दाखल होण्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सला सलामीवीर फलंदाजाची गरज आहे. यशस्वीकडे वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. यासह मुंबईला रोहितनंतर सलामीवीर फलंदाजाची गरज असणार आहे. ही जागा भरुन काढण्यासाठी यशस्वी जैस्वाल योग्य पर्याय आहे. तर राजस्थानला कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मिळू शकतो.