Mumbai Indians On Hardik Pandya Trade: रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. २०२६ मध्येही मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नव्हता. त्यामुळे हार्दिक पंड्यावर जोरदार टीका केली गेली होती. ही स्पर्धा सुरु असतानाच, आगामी हंगामात हार्दिक मुंबई इंडियन्सची साथ सोडून दुसऱ्या संघाकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. हार्दिक आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार असं म्हटलं गेलं होतं. पण मुंबई इंडियन्सने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

स्पोर्ट्स्टारने दिलेल्या वृत्तानुसार,मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत चेन्नई सुपर किंग्स किंवा इतर कुठल्याही संघासोबत अद्यापही संपर्क केलेला नाही. मुंबई इंडियन्सची टीम मॅनेजमेंट अजूनही आयपीएल २०२६ स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. गेल्या हंगामातील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने स्पोर्ट्स्टारशी बोलताना म्हटले की, “आमचा आयपीएल २०२६ स्पर्धेतील कामगिरीचा आढावा सुरु आहे. आम्ही संघाच्या सर्व पैलूंवर बारकाईने लक्ष देत आहोत. आम्ही अजूनतरी खेळाडूंच्या ट्रेडसंदर्भातील कोणत्याही चर्चेचा भाग नाही आहोत. आढावा पूर्ण झाल्यानंतर हे शक्य होईल. सध्या अनेक पर्यायांचे आणि विचारांचे मुल्यांकन केले जात आहे, ज्याला वेळ लागतो. त्यामुळे सध्यातरी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.”

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, हार्दिक पंड्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसून येऊ शकतो. पण सध्यातरी हार्दिक कुठेही जाणार नाही, असं चित्र आहे. हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्यापासून मुंबई इंडियन्सला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. गेल्या तिन्ही हंगामात मुंबईचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला होता. त्यानंतर २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला होता. त्यानंतर २०२६ मध्ये मुंबईचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला. आता आगामी हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलणार? की हार्दिक कर्णधार म्हणून कायम राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.