India Ex-player Slams Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी सध्याची आयपीएल जणू एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून संघाला ८ गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. मैदानावर या पराभवाची चर्चा शांततेत सुरू असताना, भारताचे माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या वक्तव्यांनी मैदानाबाहेर वादळ निर्माण केलं आहे.

श्रीकांत यांनी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंंड्यावर जोरदार हल्ला चढवला, त्याला ‘प्लास्टिक कॅप्टन’ म्हटलं आणि त्याच्या कर्णधारपदावर व फलंदाजीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने आतापर्यंतचे ९ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. यासह संघ आता गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वाचाही परिणाम संघाच्या कामगिरीवर सातत्याने पाहायला मिळत आहे.

हार्दिक पंड्या यंदा बिलकुल लयीत दिसलेला नाही. त्याने चेन्नईविरूद्ध सामन्यात २३ चेंडूत फक्त १८ धावा केल्या आणि संघाची धावगती १२.५ षटकांत ४ बाद १०९ वरून थेट ७ बाद १५९ पर्यंत घसरली. शेवटच्या षटकात तो बाद झाला आणि संपूर्ण डावात केवळ दोनच चौकार मारू शकला. अखेरीस चेन्नई सुपर किंग्सने हा सामना ८ विकेट्सने जिंकला.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाबाबत काय म्हणाले माजी खेळाडू?

हार्दिकच्या डावात तब्बल १० चेंडू निर्धाव (डॉट बॉल) गेले, ज्यामुळे माजी निवडकर्ता श्रीकांत आश्चर्यचकित झाले. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्यांनी हार्दिकच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, “आकडे बघा, २३ चेंडूत १८ धावा. हे काय आहे? तो ‘प्लास्टिक कर्णधार’ आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“ती भागीदारी बघा, त्यामागचा हेतू काय होता? हार्दिक नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत होता? मधल्या षटकांतील डॉट बॉल्स पाहिले, तर स्पष्ट दिसतं की कोणतंही योग्य नियोजन किंवा खेळाची जाणीव नव्हती. त्या टप्प्यात धावगती खूपच खाली आली,” असे श्रीकांत म्हणाले.

“सहाव्या-सातव्या षटकाच्या सुमारास त्यांची धावगती जवळपास ९ होती, पण त्यानंतर ती सतत घसरत गेली, ७, ७, मग एक षटक १३ धावांचं, त्यानंतर १०, मग ६. त्यानंतर ५, ४, ३, ७, ४… आणि १२ ते १६ षटकांदरम्यानच त्यांनी सामना पूर्णपणे गमावला. शेवटच्या टप्प्यातही हार्दिक फलंदाजी करत असताना फक्त ७ आणि ४ धावा झाल्या,” असं कृष्णमचारी श्रीकांत यांनी सांगितलं.

“खरं सांगायचं तर ते काय करण्याचा प्रयत्न करत होते, हेच मला समजलं नाही. त्यांची योजना काय होती? ते ते पुन्हा स्लॉटमध्ये गोलंदाजी करणार नाहीत. ते त्याला रोखून धरतील. त्यांना माहित होतं की जर त्यांनी लेंथवर गोलंदाजी केली, तर तो फटकेबाजी करेल. त्यामुळे, ते तिथे गोलंदाजी करणार नव्हते,” असं श्रीकांत म्हणाले.