आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने दमदार कामगिरी केली होती. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याला आजारी असल्याने विश्रांती देण्यात आली होती. त्याचा परिणाम या सामन्यावर दिसून आला. दरम्यान हार्दिक केव्हा परतणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता हार्दिक पंड्याच्या कमबॅकबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
हार्दिक पंड्या केव्हा परतणार?
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. तर तिसरा सामना ७ एप्रिलला गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ गुवाहाटीला रवाना झाला आहे. हार्दिक पंड्या देखील या सामन्यासाठी गुवाहाटीला रवाना झाला आहे. या वृत्तात, असं देखील म्हटलं गेलं आहे की, हार्दिक पंड्याची तब्येत इतकी खराब नव्हती. पण मुंबई इंडियन्स संघाला कुठलीही जोखीम घ्यायची नव्हती. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हार्दिक पंड्या राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार होणार की काय? अशा चर्चा रंगल्या होत्या. पण हार्दिक पंड्या पुनरागमन करणार असल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ सामना गमावून आणि १ सामना जिंकून मुंबई इंडियन्सने आतापर्यंत २ गुणांची कमाई केली आहे. -०.२०६ नेट रनरेटसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. आता राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करून मुंबईचा संघ गुणतालिकेत वर येण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
