मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सध्याच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचे आव्हान शुक्रवारच्या कोलकाता नाइट रायडर्सच्या पराभवाने संपुष्टातच आल्यात जमा आहे. अशा वेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडया टीकेच्या केंद्रस्थानी आला असून, तो थकलेला दिसत आहे इथपासून ते तो प्रचंड दडपणाखाली खेळत आहे, अशा प्रतिक्रिया क्रिकेट जाणकारांकडून समोर येत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांनी मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीत पंडयाला लक्ष्य केले आहे. ‘‘कर्णधारपदापासून सुरू झालेल्या वादापासून पंडया अद्याप स्थिरावलेला नाही. तो प्रचंड थकल्यासारखा दिसत आहे आणि कुठल्या तरी दडपणाखाली खेळत आहे,’’ असे फिंचने सांगितले.

‘‘कर्णधारपदाचा मुकुट हा नेहमीच काटेरी असतो. मी अनुभव घेतला आहे. पंडया सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या परिस्थितीतून मीदेखील गेलो आहे. त्याचे वैयक्तिक प्रयत्नही अपुरे पडत आहेत. अशा वेळी तुम्ही कर्णधार असाल, तर त्याचे दडपण वेगळे असते. अशा वेळी जबाबदारी क्रूर असल्यासारखी वाटते,’’ असे फिंच म्हणाला.

‘‘मुंबई इंडियन्स संघ सुरुवातीपासून अडखळत आहे. संघ निवडीपासून त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसून येत आहे. प्रत्येक सामन्यात बदल केले जात आहेत. मुळात कर्णधार दबावाखाली असल्यामुळे तो संघाला स्थिर ठेवू शकत नाही. फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले बदल बघता हार्दिकच्या त्रस्त मानसिकतेची कल्पना दिसून येते. हार्दिक स्वत: कुठल्याही क्रमांकावर खेळायला येताना दिसत आहे. तो काय करत आहे, हे त्यालाच कळत नाही,’’ असे स्मिथ म्हणाला.

हेही वाचा >>> “त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव”; इरफान पठाणचा मोठा दावा, म्हणाला, “पंड्याला कुणी आदर…”

ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार शेन वॉटसननेदेखील हार्दिककडे बोट दाखवले आहे. ‘‘पाच फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्याचा काही अधिकार नव्हता. मात्र, मुंबई इंडियन्सच्या गचाळ नियोजनामुळे कोलकाताला हा सामना जिंकता आला. वेंकटेश अय्यर आणि मनीष पांडेची जोडी फोडण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. यामुळे कोलकताला सामन्यात परतता आले आणि नंतर मुंबईच्या फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड करत सामना कोलकात्याच्या स्वाधीन केला,’’ असे वॉटसन म्हणाला.

हार्दिकला लय सापडली नाही -इरफान पठाण

मुळात हार्दिक पंडयाला या ‘आयपीएल’मध्ये लय सापडली नाही. त्यात कर्णधारपदाच्या नियुक्तीवरून उठलेल्या चाहत्यांच्या विरोधात पंडया आणखी हरवला, असे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण म्हणाला. ‘‘पंडयाला संघ सहकाऱ्यांकडूनही आदर मिळत नव्हता. अशा वेळी वेगळे काय होणार आहे. क्रिकेटमध्ये कर्णधारपद हे महत्त्वाचे असते. त्यातच संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याची जबाबदारीही त्याची असते. हार्दिकला मात्र, कर्णधार म्हणून संघाला हाताळता आले नाही. मुंबई एक संघ म्हणून खेळताना दिसत नव्हता. उर्वरित सामन्यांमध्ये संघाला चांगली कामगिरी करायची झाल्यास सांघिक खेळ करावा लागेल,’’ असे पठाणने सांगितले.