Hardik Pandya Meeting With Dinesh Karthik Andy Flower viral photo Fact Check: आयपीएल २०२६ नंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईची कामगिरी यंदाच्या हंगामात फार खराब ठरली. संघ स्पर्धेतून लवकर बाहेर पडला आणि गुणतालिकेत नवव्या स्थानी राहिला. यानंतर हार्दिकला कर्णधारपदावरून काढणार आणि तो मुंबई संघातून बाहेर होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांदरम्यान आता आरसीबीचे कोच अँडी फ्लॉवर आणि बॅटिंग कोच व मेंटॉर दिनेश कार्तिक यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ संपल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवर एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसरं आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी हार्दिक आणि दिनेश कार्तिक यांच्यात संभाव्य ट्रेड किंवा संघ बदलाबाबत चर्चा सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला.
विशेष म्हणजे, हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्स मधील भवितव्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सलग तीन निराशाजनक हंगामांनंतर हार्दिक मुंबई इंडियन्सपासून वेगळा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यादरम्यान त्याची भेट आरसीबीच्या दोन महत्त्वाच्या सदस्यांशी झाल्याच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी हा फोटो आणि त्यातून सुरू झालेल्या चर्चा केवळ चाहत्यांच्या अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत.
हार्दिक पंड्या खरोखरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जाणार आहे का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवर एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ही भेट आयपीएलमधील ट्रेड, संघबदल किंवा करार चर्चेशी संबंधित होती, असं दर्शवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. सध्या तरी याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
हार्दिक पंड्याने दिनेश कार्तिक-अँडी फ्लॉवरची खरंच भेट घेतली का? काय आहे फोटोमागचं सत्य?
अहवालांनुसार, हा फोटो अहमदाबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएल २०२६ची अंतिम फेरी ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये पार पडली होती आणि विजेतेपदानंतर आरसीबीचा संघ १ जूनपर्यंत तिथेच होता. दुसरीकडे, अहमदाबाद हे हार्दिक पंड्याचेही मूळ ठिकाण आहे. त्यामुळे त्या शहरात झालेली भेट नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे, ना हार्दिक पंड्या, ना आरसीबी, ना मुंबई इंडियन्स यांनी या भेटीचा किंवा संभाव्य संघबदलाचा कोणताही अधिकृत उल्लेख केलेला नाही.
याशिवाय, अनेक नेटकऱ्यांनी हा फोटो AI वापरून तयार केल्याचा संशय व्यक्त केला आहे. फोटोतील हार्दिकची हेअरस्टाईल त्याच्या अलीकडील लुकपेक्षा वेगळी दिसत असल्याचं दिसत आहे. तसेच, त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा हिने त्याच काळात फ्रान्समधील सहलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना २४ मे रोजी झाल्यानंतर हार्दिक भारताबाहेर गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी हार्दिक पंड्या आरसीबीमध्ये जाणार असल्याची चर्चा केवळ अफवा आणि सोशल मीडियावरील तर्क-वितर्कांपुरतीच मर्यादित आहे.
