Hardik Pandya, Mumbai Indians: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला गेल्या काही हंगामात आयपीएलची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना ५ वेळा जेतेपदाचा मान पटकावला होता. २०२४ च्या हंगामाआधी रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. गेल्या २ हंगामासह मुंबईचा संघ या हंगामातही ट्रॉफीपासून वंचित राहिला. दरम्यान या फ्लॉप कामगिरीनंतर हार्दिक मध्येच कर्णधारपद सोडणार होता.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२६ स्पर्धेतही सुपर फ्लॉप कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरून काढून, त्याच्या जागी दुसऱ्या कर्णधाराला संधी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याचा मानसिक तणाव वाढला आहे. क्रिकेट चाहत्यांकडून होत असलेल्या हुटिंगमुळे तो थकला आहे. त्यामुळे त्याने स्पर्धा सुरू असतानाच कर्णधारपद सोडण्याचा विचार केला होता.

एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. मुंबईचा संघ या हंगामातून अधिकृतरित्या बाहेर पडणार, त्याआधीच हार्दिकने संघाची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून तर फ्लॉप ठरला. यासह फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

नेहमी टॉपमध्ये असणारा मुंबईचा संघ यावेळी एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला. मुंबईला १४ पैकी १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी राहिला. साखळी फेरीतील सामने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सला लक्षात आलं होतं की, मुंबई यावेळीही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही. त्यावेळी मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंट आणि हार्दिक पंड्या यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान हार्दिकने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आले होते. आता असा अंदाज लावला जात आहे की, नव्या कर्णधाराचा शोध घेता यावा म्हणून हार्दिकला बाहेर ठेवण्यात आलं होतं.