वृत्तसंस्था, मुंबई
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या हंगामातील सलग चौथ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या कामगिरीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना आता काही अवघड निर्णय घेण्याबाबत विचार करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबई संघाला विजयपथावर आणायचे झाल्यास प्रत्येक खेळाडूने जबाबदारी स्वीकारायला हवी, असेही त्याने स्पष्ट केले.

पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघाने यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाची विजयासह सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर मुंबईला सलग चार सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. गुरुवारी घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात मुंबई संघाला पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. फलंदाज क्विंटन डिकॉक आणि नमन धीर, तर गोलंदाजीत अल्ला घझनफरचा अपवाद वगळता मुंबईच्या सर्वच खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत केवळ दोन गुणांसह नवव्या स्थानावर घसरला आहे.

‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर आत्ता माझ्याकडे जास्त काही सांगण्यासारखे नाही. आम्हाला बहुधा पुन्हा सुरुवातीपासून विचार करण्याची गरज आहे. आम्ही व्यक्तिगत पातळीवर कमी पडत आहोत की संघ म्हणून आमच्या नियोजनात कमतरता आहे, हे तपासून आम्हाला पुढचे पाऊल ठरवावे लागेल,’’ असे हार्दिक पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला.

संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अपयशी कामगिरीकडे हार्दिकने अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले. अलीकडेच ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा भाग असणारे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमरा या नामांकित खेळाडूंनी यंदा ‘आयपीएल’मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. ‘‘काही अवघड निर्णय घ्यायचे की सध्याचे संयोजन कायम ठेवून परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची, हे आता आम्हाला ठरवावे लागेल. आमच्यासमोर काही कठीण प्रश्न आहेत, आम्हाला त्यांची उत्तरे शोधावीच लागतील. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे,’’ असे हार्दिकने नमूद केले.

श्रेयसकडून प्रभसिमरनचे कौतुक

दरम्यान, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. ‘‘आम्ही आत्मविश्वासाने खेळत आहोत आणि योजनांची अंमलबजावणी करत आहोत. हा विजय त्यामुळेच शक्य झाला आहे,’’ असे श्रेयस म्हणाला. त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंग याच्या परिपक्व फलंदाजीचेही कौतुक केले. प्रभसिमरनने नाबाद ८० धावा करत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ‘‘गेल्या हंगामात प्रभसिमरन आक्रमक फलंदाजी करत होता, पण तो अनेकदा वेडेवाकडे फटके मारायचा. यंदा त्याने स्वत:च्या फलंदाजीचा स्तर उंचावला आहे. तो आताही फटकेबाजी करतो. मात्र त्यात बेजबाबदारपणा नाही. याचा आम्हाला निश्चित फायदा होत आहे,’’ असे श्रेयसने सांगितले.

‘एकट्या हार्दिकला जबाबदार धरणे अयोग्य’

मुंबई इंडियन्स संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार हार्दिकवर बरीच टीका केली जात आहे. हार्दिकला खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्यात अपयश येत असल्याचे, तसेच गोलंदाजांचा योग्य वापर करणेही शक्य होत नसल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, संघाच्या अपयशासाठी केवळ हार्दिकला जबाबदार धरणे अयोग्य असल्याचे मुंबईचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेला वाटते. ‘‘सर्व खेळाडूंनी योगदान दिल्याशिवाय आम्हाला यश मिळवता येणार नाही. आमच्या संघाची कामगिरी कशी सुधारू शकेल हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आणि व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर आहे,’’ असे जयवर्धने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

प्रशिक्षक जयवर्धनेकडून बुमराची पाठराखण

विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेल्या जसप्रीत बुमराला यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील पाच सामन्यांत एकही बळी मिळवता आलेला नाही. मात्र, मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने त्याची पाठराखण केली आहे.

‘‘बुमराची बळींची पाटी कोरी असली, तरी तो गोलंदाजी चांगली करत आहे. आमचे गोलंदाज ‘पॉवर-प्ले’मध्ये प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर दडपण आणण्यात कमी पडत आहेत. ‘पॉवर-प्ले’मध्ये चांगली सुरुवात मिळाल्यानंतर फलंदाज निश्चिंत होऊन खेळतात. त्यांना बुमराविरुद्ध धोका पत्करावा लागत नाही. त्यामुळे बुमराला बळी मिळवणे अवघड जात आहे,’’ असे जयवर्धने म्हणाला.

ल्ल तसेच बुमराच्या गोलंदाजीचा वेगही कमी-जास्त होत आहे. याबाबत विचारले असता, ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान बुमराला दुखापत झाली होती. याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही सामन्यांत त्याच्या गोलंदाजीचा वेग पुन्हा वाढला आहे. ही निश्चित सकारात्मक बाब आहे,’’ असे जयवर्धनेने नमूद केले.