Hardik Pandya Trade, IPL 2027: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळा जेतेपदाचा मान पटकावला होता. पण त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली. पण हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या ३ पैकी हंगामात मुंबईचा संघ तळाशी राहिला आहे. ही फ्लॉप कामगिरी पाहता, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आयपीएल २०२७ स्पर्धेआधी हार्दिक पंड्याच्या आयपीएल ट्रेडबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रेवस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या आणि राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्यात ट्रेड होऊ शकतो. कारण मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहे. भविष्यात जैस्वाल हा रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. कारण यशस्वीला मुंबईत खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. या वृत्तत, सूर्यकुमार यादवबाबतही खुलासा करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवही मुंबईची साथ सोडू शकतो.

येत्या काही दिवसात मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटच्या सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोचिंग स्टाफमधील सदस्य आणि काही स्टार खेळाडूंच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पंड्या आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये ट्रेड होऊ शकतो. जर हार्दिकने संघाची साथ सोडली, तर तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यामुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता. आता झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण तो दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकला नव्हता. दुखापतींमुळे त्याला अनेक महत्वाच्या मालिकांमधून बाहेर पडावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्स संघासोबत नाव जोडलं जाण्याआधी हार्दिकचं नाव चेन्नई सुपर किंग्स संघासोबत जोडलं गेलं होतं. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांच्यात ट्रेड होणार असल्याची चर्चा होती. कारण मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना अष्टपैलू खेळाडूची गरज होती.