Hardik Pandya Muril Kartik Video: भारताने रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव करत ७ विकेट्सने सामना आपल्या नावे केला. पण या सामन्यापूर्वी मैदानावर घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की मैदानावर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वीचा हार्दिक व मुरली कार्तिक यांचा हा व्हीडिओ आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी हा व्हीडिओ रेकॉर्ड केला आहे. सुरूवातीला हार्दिकने मुरली कार्तिकला हँडशेक केला, पण नंतर सरावासाठी जाताना तो त्याला काहीतरी बोलताना दिसला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्या सरावासाठी मैदानावर आल्याचे दिसून येते, त्याच्या हातात तो बॅट आणि ग्लोव्हज घेऊन होता. काही पावलं चालल्यानंतर तो मुरली कार्तिकला भेटला. दोघांनी हस्तांदोलन केलं, पण लगेच हार्दिक जाताना वळून मुरली कार्तिकला काहीतरी बोलताना दिसला. हार्दिक खूप रागावलेला दिसला आणि त्यावर मुरली कार्तिकही त्याच्या दिशेने चालत येत त्याला उत्तर देताना दिसला. हार्दिकच्या हावभावांवरून आणि देहबोलीवरून असं दिसून आलं की तो एखाद्या गोष्टीमुळे नाराज आहे, परंतु वादाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट्स केल्या आहेत आणि म्हटलं जातंय की हार्दिक पंड्या मुरली कार्तिकवर रागावला असल्याचं म्हटलं. हार्दिकजवळ जाऊन मुरली कार्तिक त्याला काहीतरी समजावताना देखील दिसला. तर पुढे जाणारा हार्दिकही मुरली कार्तिकचं म्हणणं ऐकून घेताना व्हीडिओसमध्ये दिसत आहे.
भारतीय संघासाठी दुसरा टी-२० सामना रेकॉर्डब्रेकिंग होता. टीम इडियाने सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्या वादळी फटकेबाजीच्या बळावर अवघ्या १५.२ षटकांत २०९ धावांचं आव्हान गाठलं. यासह फलंदाजीला उतरण्याची संधी न मिळालेल्या हार्दिक पंड्याने गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले. त्याने आपल्या तीन षटकांत फक्त २५ धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. यासह आता तिसरा टी-२० सामना रविवारी २५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास टी-२० मालिका आपल्या नावे करेल.
