Who is Hardik Pandya’s Cricketing Idol: हार्दिक पंड्या हा टीम इंडियासाठी गेमचेंजर खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याने अनेकदा बॅट आणि बॉल दोन्हीने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्यादेखील बीसीसीआयच्या नमन अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित होता. या कार्यक्रमामध्ये हर्षा भोगले यांनी निवडक खेळाडूंची मुलाखत घेतली, ज्यामध्ये हार्दिक पंड्याचा देखील समावेश होता. हार्दिकला यादरम्यान त्याचा आदर्श खेळाडू हे विचारण्यात आल्यावर त्याने अगदी वेगळंच नाव घेत सर्वांचं लक्ष वेधलं.

हार्दिक पंड्याने जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून हार्दिक भारतासाठी महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. काही सामन्यांमध्ये हार्दिकने भारतीय संघाचं नेतृत्त्वही केलं आहे. हार्दिक २०२४ आणि २०२६ मधील टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. हार्दिकचं २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील अखेरचं षटक आणि क्लासेनची महत्त्वपूर्ण विकेट कोणीच विसरू शकत नाही.

बीसीसीआय अवॉर्ड सोहळ्यात हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांची खास मुलाखत घेण्यात आली. यामध्ये सर्वांना त्यांचे क्रिकेटमधील आदर्श कोण आहे, हा प्रश्न विचारताच हार्दिक पंड्याने माजी खेळाडू वसीम जाफर यांचं नाव घेतलं. वसीम जाफर यांनी भारतासाठी ३३ सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी वसीम जाफर यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा तयार केला. वसीम जाफर हे रणजी स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारे पहिले खेळाडू आहेत.

कोण आहे हार्दिक पंड्याचा आदर्श खेळाडू वसीम जाफर?

हार्दिक पंड्याच्या मते, २००० च्या दशकात भारतासाठी खेळलेले माजी सलामीवीर वसीम जाफर हे त्याचे लहानपणापासूनचे क्रिकेटमधील आदर्श होते. जाफर यांनी २००० ते २००८ या कालावधीत भारतासाठी ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण १९४४ धावा, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० धावा केल्या. आठ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी भारतीय संघासाठी ५ शतकं आणि ११ अर्धशतकं झळकावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वसीम जाफर यांनी तज्ज्ञ आणि समालोचक म्हणूनही काम केलं आहे. तसेच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. उजव्या हाताचे फलंदाज असलेल्या वसीम जाफर यांनी अनेक वर्षे मुंबई क्रिकेट संघ आणि विदर्भ क्रिकेट संघ यांचे प्रतिनिधित्व करत रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसले. भारतातील या प्रमुख देशांतर्गत लाल चेंडूच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही जाफर यांच्या नावावर आहे.

दरम्यान हार्दिक पंड्यासह इतर तिन्ही खेळाडूंनीही आपल्या आदर्श खेळाडूंची नावं घेतली. संजू सॅमसनन सचिन तेंडुलकर यांना आपला आदर्श मानलं असल्याचं सांगितलं. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अभिषेक शर्मासाठी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि त्याचा मार्गदर्शक युवराज सिंह आदर्श असल्याचं सांगितलं. दुसरीकडे, अवघ्या १४ वर्षांचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने ब्रायन लारा आणि युवराज सिंह यांना आपले क्रिकेटमधील आदर्श असल्याचे सांगितले.