Hardik Pandya On Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात आधी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना सुरु व्हायला उशीर झाला. १० वाजून १० मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. ११-११ षटकांचा सामना होणार असं ठरलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने ११ षटकांअखेर १५० धावा केल्या. राजस्थानकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरूवात करुन दिली. दरम्यान वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून हार्दिक पंड्याने देखील त्याचं कौतुक केलं.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने मिळून दमदार सुरुवात करून दिली. यशस्वीने पहिल्याच षटकात दीपक चाहरच्या षटकात चांगलाच हल्लाबोल केला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने अवघ्या १४ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली. वैभवची फटकेबाजी पाहून हार्दिक पंड्याही त्याच्या फलंदाजीचा फॅन झाला आहे.
मुंबईला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला. मुंबईच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला, पण ११ षटकांअखेर १२३ धावांपर्यंत मजल मारता आली. सामना झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना हार्दिक पंड्या म्हणाला, “१६-१७ वर्षांच्या मुलाला अशा पद्धतीने खेळताना पाहणं खूप आकर्षक आहे. त्याचबरोबर, सामन्यापूर्वीच्या त्याच्या तयारीबद्दलही सध्या बरीच चर्चा सुरु आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, ज्या पद्धतीचे फटके मारतो ते पाहणं आश्चर्यकारक आहे. मी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा देतो.”
या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीच्या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. वैभवने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. त्यानंतर याच षटकात आणखी एक षटकार खेचला. यशस्वी ७७ धावांवर नाबाद राहिला. तर वैभवने ३९ आणि रियान परागने २० धावा केल्या. १५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईला सुरूवातीलाच मोठे धक्के बसल. रायन रिकल्टन ८ आणि रोहित शर्मा ५ धावा करून माघारी परतले. तर सूर्यकुमार यादव ६, तिलक वर्माने १४ धावांचे योगदान दिले. शेवटी रुदरफोर्ड आणि नमन धीरने प्रत्येकी २५-२५ धावांचे योगदान दिले. पण मुंबईने हा सामना २७ धावांनी गमावला.
