IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंजादी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत चांगला खेळ करून भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, सामन्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली. “२०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र, तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर होता”, असे तो म्हणाला.

हेही वाचा – Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

नेमकं काय म्हणाले हार्दिक पंड्या?

“मला तो दिवस आजही आठवतो, जेव्हा मला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. २०१८ च्या आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना याच मैदानावर ती घटना घडली होती. भूतकाळात घडलेल्या अशा घटनांतून पुढे जाताना तुम्हाला काहीतरी केल्याचं समाधान मिळते. आज मला ती संधी मिळाली होती. हा प्रवास अतिशय सुंदर होता. खरं तर आपल्या मेहनतीची फळं आपल्यालाच मिळतात. मात्र, त्यामागे अनेकांची मेहनत असते, त्यांना श्रेय मिळत नाही”, अशी प्रतिक्रिया हार्दिक पंड्याने दिली.

हेही वाचा – India Beats Pakistan: भारताच्या विजयानंतर शाहीद आफ्रिदी हार्दिक पंड्याच्या खेळीवर फिदा; म्हणाला, “पंड्याने दोन्ही…”

“मी विचार करत होतो, शेवटच्या षटकात सात धावांची आवश्यता होती. सात धावा काढणं खूप मोठं आव्हान नव्हतं, यावेळी १० ही खेळाडून सीमा रेषेवर ठेवले असते, तरी मला काही फरक पडला नसता, मला एक मोठा फटका मारायचा होता. माझ्यावर कोणताच दबाव नव्हता, दबाव हा गोलंदाजावर होता, हे मला माहिती होतं, त्यामुळे तो चेंडू कसा टाकणार, याची मल कल्पना होती आणि मी त्याचा फायदा घेतला”, असेही तो म्हणाला.