Hardik Pandya Ruturaj Gaikwad Handshake Snub Video: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात २ मे रोजी सामना खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला आहे. यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सचा दोन वेळा पराभव केला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा यांच्या भागीदारीमुळे चेपॉकच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा पराभव केला. या सामन्यानंतर हार्दिकने ऋतुराजकडे दुर्लक्ष करत त्याला हँडशेक न केल्याचा व्हीडिओ सध्या समोर आला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक पंड्या आणि ऋतुराज गायकवाड यांचा सोशल मीडियावरील व्हीडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्यानंतर चेन्नईच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याच्या कृतीला “अहंकारी” व “अनादर करणारी” असं चाहत्यांनी म्हटलं आहे.

या व्हायरल व्हीडिओनंतर हार्दिक पंड्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हार्दिक पंड्याची खेळभावना कुठे गेली, असे प्रश्नदेखील चाहते विचारत आहेत. या व्हीडिओमध्ये सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करत होता. त्याने सगळ्यात आधी रघु शर्माला हँडशेक केलं. यानंतर मागून हार्दिक पंड्या येत होता. ऋतुराजने त्याच्यासमोर देखील हँडशेकसाठी हात पुढे केला. पण हार्दिक सरळ पुढे निघून गेला, यानंतर ऋतुराजने सर्वांशी हस्तांदोलन केलं. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हार्दिक-ऋतुराजच्या व्हीडिओमागील नेमकं सत्य काय?

हा सामन्यातील छोट्या एका व्हीडिओचा भाग आहे. पण सत्य म्हणजे सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या आणि ऋतुराज गायकवाड यांनी हस्तांदोलन केलं होतं. त्यामुळेच ऋतुराज व हार्दिक यांनी हस्तांदोलन केलं नाही. हा क्षण व्हायरल झालेल्या छोट्या क्लिपमध्ये ठळकपणे दिसला नसल्यामुळे चुकीचा अर्थ लावला गेला. सोशल मीडियावरील या अशा अर्धवट व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये वादंग निर्माण होतात.

मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने फलंदाजीला सुरूवातही चांगली केली. ९० धावा करत २ विकेट्स अशी संघाची स्थिती होती. पण १० षटकांनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी विकेट्सचा सिलसिला सुरू केला आणि धावांना ब्रेक लागला. यासह संघ फक्त १५९ धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्स संघाने ऋतुराज गायकवाड व कार्तिक शर्मा यांच्या ९८ धावांच्या भागीदारीच्या बळावर १८.१ षटकांत सहज सामना जिंकला.