scorecardresearch

UAE वरुन परतणाऱ्या हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली पाच कोटींची घड्याळं

ही घड्याळं कस्टममध्ये दाखवण्यात आलेली नव्हती आणि त्याची बिलंही पांड्याकडे नव्हती म्हणून ती कस्टम विभागाने जप्त केली

Hardik Pandya Rs 5 crore watches held up at Mumbai airport
मुंबई विमानतळावर करण्यात आली कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला टी-२० विश्वचषकामध्ये विशेष छाप पाडता आली नाही. सध्या मैदानात त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा कमी झाल्यात. खराब फॉर्म आणि आरोग्याशी संबंधित तक्रारींमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमधून त्याला डच्चू देण्यात आलाय. अशातच आता तो मैदानाबाहेरील एका कृत्यामुळे चर्चेत आलाय. कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर हार्दिक पंड्याने आणलेली दोन महागडी घड्याळं जप्त केली आहेत. हार्दिक पंड्याच्या या घड्याळांची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी पांड्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होता. तिथून परत येताना विमानतळावर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

नक्की पाहा हे फोटो >> एकेकाळी मॅगीवर पोट भरणाऱ्या हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत आहे पाच कोटी, पाहा खास फोटो

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मायदेशी परतल्यानंतर कस्टम विभागाने हार्दिक पंड्याला विमानतळावर रखले. त्यानंतर तपासादरम्यान त्यांनी हार्दिक पंड्याकडील दोन महागडी घड्याळं ताब्यात घेतली. हार्दिक पंड्याने या घड्याळांना कस्टममधील वस्तू म्हणून दाखवलं नव्हतं तसेच त्याच्याकडे या घड्याळांची बिलंही नसल्याचं आढळून आल्याने ती कस्टम विभागाने ताब्यात घेतलीय. मुंबई विमानतळावर हा सारा प्रकार घडला.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

हार्दिक पंड्याला आलिशान घड्याळांची फार आवड असल्याचं सर्वांना माहितीय. त्याच्याकडे पाटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ सहीत इतरही काही महागडी घड्याळं आहेत. मागील वर्षी हार्दिक पंड्याचा भाऊ क्रुणाल पांड्यासुद्धा महागडं घड्याळ आणल्याप्रकरणी कस्टमच्या कारवाईत अडकला होता. क्रुणालने महागडी घड्याळं आणल्याचं कस्टमला कळवलं नव्हतं. त्यानंतर त्याची घड्याळं ताब्यात घेण्यात आलेली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2021 at 08:22 IST

संबंधित बातम्या