Hardik Pandya IPL Gujarat Titans: हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये पदार्पणाच्या वर्षीच जेतेपदावर नाव कोरलं. पुढच्याच वर्षी त्यांनी फायनलमध्ये धडक मारत सातत्य दाखवलं. मात्र यानंतर मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकसाठी तिजोरी रिती केली. पुनरागमन पक्कं होताच, रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिककडे सोपवण्यात आलं. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच जेतेपदांवर नाव कोरलं होतं. रोहितऐवजी हार्दिकची निवड केल्यानंतर संघाला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. हार्दिक कर्णधार झाल्यानंतर मुंबईची कामगिरी यथातथाच राहिली आहे. यंदाच्या हंगामानंतर हार्दिकला मुंबई सोडणार अशा चर्चा होत्या.
हार्दिकच्या पुनरागमनसाठी गुजरात टायटन्स तयार होतं. कर्णधार शुबमन गिलही या ट्रेडसाठी तयार होता. मात्र हार्दिकने कर्णधारपदाची अट ठेवताच गुजरातने चर्चेतून माघार घेतली. गिल भारतात टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार आहे.
हार्दिक गुजरातकडून खेळत असताना संघाला संतुलन मिळवून द्यायचा. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि कर्णधारपद अशा सगळ्या आघाड्या त्याने समर्थपणे सांभाळल्या. गुजरातच्या कामगिरीत त्याचं प्रतिबिंब उमटलं. चांगली वाटचाल होत असतानाही हार्दिकने गुजरातला सोडून मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हार्दिकच्या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. हार्दिकने पैेशांसाठी हा निर्णय घेतला असा टीकेचा सूर होता.
या ट्रेडऑफ संदर्भात गुजरात टायटन्स व्यवस्थापनाला विचारलं असता त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हार्दिक पंड्याने वैयक्तिक पातळीवर कोणत्याही फ्रॅंजाइजीशी चर्चा केलेली नाही. अशी चर्चा झाली असल्यास ती मुंबई इंडियन्सच्या माध्यमातूनच झालेली असू शकते असं हार्दिकच्या प्रतिनिधीने सांगितलं.
यंदाच्या हंगामानंतर मुंबई इंडियन्स हार्दिकला कर्णधार म्हणून तसंच खेळाडू म्हणून रिटेन करण्यास उत्सुक नाही, यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनेच वृत्त दिलं होतं. यंदा मुंबईने १४पैकी १० लढती गमावल्या. त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सलग सहाव्या वर्षी मुंबईचा जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.
मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लढतीनंतर संघाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. कोचिंग टीमने डेटासह काही गोष्टी सांगितल्या मात्र काही खेळाडूंनी ते ऐकलं नाही असं कोचिंग टीमचं म्हणणं होतं.
टी२० क्रिकेटच्या बदलत्या समीकरणांमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ मागे पडला आहे. बाकी संघ पॉवरप्लेमध्ये जोरदार आक्रमण करून विजयाचा पाया रचत आहेत. बहुतांश संघ युवा खेळाडूंना स्वातंत्र्य देत आहेत. हे युवा खेळाडू बेधडकपणे फटकेबाजी करत आहेत. मुंबई इंडियन्सचे ज्युनियर, सीनिअर सगळेच खेळाडू धावांसाठी संघर्ष करताना दिसले. गोलंदाजीतही कल्पकता दिसली नाही. त्यांचे खेळाडू ऑरेंज कॅप किंवा परपल कॅपच्या शर्यतीत नव्हते.
