Hardik Pandya Wearing Mask in Lucknow: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी-२० सामना लखनौमध्ये होणार आहे. पण लखनौमधील हवामान पाहता नाणेफेक अद्याप झालेली नाही. यादरम्यान भारताचे खेळाडू, कोच गंभीर मैदानावर चर्चा करताना दिसत होते. यादरम्यान हार्दिक पंड्या चेहऱ्याला मास्क लावून मैदानावर उतरला होता. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

लखनौमध्ये होत असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान धुक्यांबरोबर प्रदूषण हा चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. हार्दिक पंड्याने मैदानावर मास्क घातला होता. लखनौच्या प्रदूषणामुळे त्याने मास्क घातला होता असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की सामन्यादरम्यान लखनौमध्ये प्रदूषणाची पातळी ४०० पेक्षा जास्त होती. इतक्या उच्च प्रदूषणाच्या पातळीत बाहेर राहणं अत्यंत हानिकारक आहे.

हार्दिक पंड्या मैदानावर काही काळासाठीच मास्क घालून उतरला होता. थोड्या वेळाने जेव्हा तो मैदानात परतला तेव्हा त्याने मास्क घातलेला नव्हता. पंड्याशिवाय इतर भारतीय खेळाडूंनी मास्क घतला नव्हता. तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही मास्क घातले नव्हते. पण, हवामान वेबसाइटनुसार, संध्याकाळी ७:३० वाजता लखनौमधील हवेची गुणवत्ता पातळी ४०० पेक्षा जास्त होती.

हार्दिक पंड्या जेव्हा मास्क घालून मैदानावर उतरला होता, तेव्हा तो हातवारे करत कोणाशीतरी बोलताना दिसला. यादरम्यान कॉमेंंट्री करताना आकाश चोप्रा व इरफान पठाण यांनी त्याचे हातवारे पाहून सांगितलं की, हार्दिक पंड्याने घसा खराब असल्याने मास्क घातलं असल्याचं हातवारे करत म्हटलं.

लखनौ टी-२० सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार होती, पण लखनौ स्टेडियमवर दाट धुकं होतं, त्यामुळे नाणेफेकीची वेळ पुढे ढकलण्यात आली. पण ८.३० नंतरही नाणेफेक झालेली नाही. लखनौ स्टेडियममधील स्टँड क्वचितच दिसत होते. ९.४६ ही ५ सामन्यांचा सामना होण्याची कट ऑफ वेळ आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लादेखील लखनौमध्ये सामना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.