Hardik Pandya Jasprit Bumrah Dispute Video: हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सला यंदाच्या स्पर्धेतील सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाब किंग्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यातही मुंबईला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात मुंबईची गोलंदाजी साधारणच होती. प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर संघाने २० षटकांत पाच गडी गमावून १९५ धावा केल्या, परंतु मुंबईला या लक्ष्याचा बचाव करता आला नाही. यादरम्यान हार्दिक व बुमराहमध्ये मैदानावर वाद झाल्याचं दिसून आलं, ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीदरम्यान संघातील खेळाडूंवर खूप संतापलेला दिसला. क्षेत्ररक्षण सेट करत असताना जसप्रीत बुमराहवर नाराज असलेल्या हार्दिक पंड्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या शाब्दिक चकमकीदरम्यान बुमराहची प्रतिक्रिया हार्दिक पंड्याच्या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसत होते.

मुंबई इंडियन्स संघात वाद?

हार्दिकला फिल्ड सेट करण्यासाठी बुमराह सजेशन देताना दिसला, पण बुमराहचं न ऐकता हार्दिक त्याचीच फिल्ड सेट करत वैतागताना दिसला आणि शेवटी हतबल होऊन बुमराहने हात झटकत हार्दिकने सांगितल्याप्रमाणे ऐकलं. बुमराहच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून चाहते प्रचंड संतापले आहेत. बुमराहसारख्या गोलंदाजाला हार्दिक अशी वागणूक देऊच कशी शकतो, असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

आयपीएल २०२६ ची सुरूवात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी चांगली झालेली नाही. या हंगामात सर्व फलंदाज त्याच्याविरुद्ध सावधपणे खेळत आहेत आणि आपली विकेट गमावणं टाळत आहेत. यामुळेच आयपीएल २०२६ मध्ये बुमराहला सलग पाच सामन्यांमध्ये एकही विकेट मिळवता आलेली नाही. बुमराहला विकेट्स न मिळणं हे मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे, कारण त्यामुळे इतर गोलंदाजांवरील दबाव वाढला आहे. शिवाय दीपक चहर, बोल्टसारखे खेळाडू देखील विकेट्स घेण्यात अपयशी ठरत आहेत.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ मध्ये एकूण पाच सामने खेळले आहेत. या पाचपैकी मुंबईने फक्त एकच सामना जिंकला आहे. हंगामातील पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईने सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळेच ते गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहेत. म्हणून, जर मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.