Hardik Pandya Special Message To Gautami Naik: सध्या भारतात महिला क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात जायंट्सवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाज गौतमी नाईकने ५५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने ७७ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ गडी बाद १७८ धावांचा डोंगर उभारला. या दमदार खेळीच्या बळावर तिची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने तिला एक खास व्हिडिओ मेसेज दिला.

महिला प्रीमियर लीगकडून हार्दिक पंड्याचा एक खास व्हिडिओ मेसेज देणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “हाय गौतमी, मी हार्दिक. मला समजलंय की मी तुझा क्रिकेटमधील आदर्श आहे. मला युवा खेळाडूंना प्रेरित करायला खूप आवडतं. पहिल्या अर्धशतकाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. खेळाचा आनंद घे. मला आशा आहे की, आयुष्यात पुढे तू संघासाठी आणि देशासाठी आणखी चांगली कामगिरी करशील. अशीच मेहनत करत राहा, शिस्तीचं पालन कर आणि मजा कर.”

आपल्या आवडत्या खेळाडूने आपलं कौतुक केल्यानंतर आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीसं गौतमी नाईकसोबत घडलं. हार्दिकने तिला व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. व्हिडिओ मेसेज पाहिल्यानंतर तिने देखील हार्दिकचे आभार मानले. हार्दिक पंड्या आणि गौतमी नाईकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतमी म्हणाली, “हार्दिक पंड्या हे माझे क्रिकेटमधील आदर्श आहेत. मला त्यांच्यासारखं खेळायचं आहे. मी नेहमी त्यांना खेळताना पाहते, तेव्हा एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, कितीही दबाव असला तरीदेखील ते शांत राहतात. माझा स्वभाव देखील असाच आहे. मला देखील त्यांच्यासारखं खेळायचं आहे.” गौतमी नाईकच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.