Hardik Pandya Statement: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मुंबईला विजयासाठी २०८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डीकॉक पासून ते शेफरेन रुदरफोर्डपर्यंत सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. मुंबईला हा सामना १०३ धावांनी गमवावा लागला. स्पर्धेतील पाचवा सामना गमावल्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला? जाणून घ्या.
धावांचा पाठलाग करताना मुंबईला पावरप्लेमध्ये हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. याबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “मला वाटतं, पावरप्लेमध्ये विकेट गेल्यानंतर काम अवघड होतं. कारण त्यामुळे आम्ही सामन्यात मागे पडत गेलो आणि त्यानंतर सावरू शकलो नाही.”
तसेच खेळपट्टीबाबत बोलताना तो म्हणाला की, “मी खेळपट्टीबद्दल काही बोलणार नाही. मी असा व्यक्ती नाही, जो पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडणार. त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. त्यांनी २०७ धावांचा डोंगर उभारला. तीच खेळपट्टी होती. आम्ही फक्त चांगली फलंदाजी करायला हवी होती. आमच्या फिरकी गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. संजूने अप्रतिम फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजांनी सातत्याने धावा करत त्यांना एका मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी आम्हाला पावरप्लेमध्ये चांगल्या सुरुवातीची गरज होती. मोमेंटम आमच्या बाजूने असायला हवा होता, पण ते आम्हाला जमलं नाही.
पहिल्या डावात फलंदाजी करताना संजू सॅमसनने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०७ धावांचा डोंगर उभारला. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २०८ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेला क्विंटन डीकॉक शून्यावर माघारी परतला. तर दानिश मालेवार आणि नमन धीर हे दोघेही शून्यावर माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने मिळून मुंबईचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तिलक वर्मा ३७ धावांवर बाद होताच मुंबईला लागोपाठ ३ मोठे धक्के बसले. सूर्यकुमार यादव ३७ धावा करून माघारी परतला. तर हार्दिक पंड्या १ आणि रूदरफोर्ड शून्यावर बाद झाला. मुंबईचा डाव १९ षटकात अवघ्या १०४ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना १०३ धावांनी गमावला.
