Hardik Pandy Statement on MI Defeat vs RR: मुंबई इंडियन्सला राजस्थानविरूद्धच्या सामन्यात २७ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पावसामुळे गुवाहाटीमधील हा सामना उशिरा सुरू झाला, त्यामुळे सामना ११ षटकांचा खेळवण्यात आला. या ११ षटकांच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने मुंबईला एकदाही सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. मुंबईच्या गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघाने ११ षटकांत १५० धावांचा डोंगर उभारला. मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला.

हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या हजेरीमुळे खेळपट्टी बराच काळ कव्हर्सखाली असल्याने गोलंदाजीला साथ मिळण्याची मोठी शक्यता होती. पण पहिल्याच चेंडूपासून वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या दोघांनी मिळून २.४ षटकांत ५० धावांचा पल्ला गाठला. तर ३.४ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ५९ धावा कुटल्या. वैभव सूर्यवंशी १४ चेंडूत ५ षटकार व एका चौकारासह ३९ धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ३२ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा करत माघारी परतला. तर रियान परागने १० चेंडूत २ षटकार व एका चौकारासह २० धावांचं योगदान दिलं. या तिघांच्या वादळी फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने ११ षटकांत १५० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ११ षटकांत ९ बाद १२३ धावा करू शकला.

मुंबईच्या पॉवरप्लेमधील गोलंदाजीबद्दल बोलताना हार्दिक पंड्या गोलंदाजांवर चांगलाच संतापला. बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावरचा राग व निराश स्पष्ट दिसत होती. हार्दिक म्हणाला, “मला वाटतं आम्ही ज्याप्रकारे गोलंदाजी करायला हवी होती, ती नीट करू शकलो नाही आणि त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. माझ्या मते आमच्या गोलंदाजांनी जबाबदारी घ्यायला हवी. गोलंदाजी विभाग म्हणून आम्ही अजिबात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही आणि त्यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळलं.”

मुंबईकडून दीपक चहरने एका षटकात २२ धावा, बुमराहने ३ षटकांत ३२ धावा, ट्रेंट बोल्टने एका षटकात २२ धावा, हार्दिकने २ षटकांत १७ धावा तर शार्दुलने १ विकेट घेत २ षटकांत ३६ दावा दिल्या. याशिवाय अल्लाह गझनफरने २ षटकांत २ विकेट्स घेत सर्वात कमी २१ धावा दिल्या. मुंबईच्या अशा गोलंदाजीमुळे राजस्थान संघ विक्रमी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

हार्दिक पंड्याने कोणाच्या डोक्यावर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर?

फलंदाजी अधिक चांगली व्हायला हवी होती का, या प्रश्नाचं उत्तर देताना हार्दिक म्हणाला, “मी या पराभवाचे खापर फलंदाजीवर मुळीच फोडणार नाही. ही पूर्णपणे गोलंदाजांची चूक होती आणि त्यांनीच या पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी. टी-२० क्रिकेटमध्ये नेहमीचं योग्य वेळी चेंडू टाकणं महत्त्वाचं असतं आणि तुम्ही २७ धावांचा हिशोब पाहिला, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण फक्त ५ चांगल्या चेंडूंबद्दल बोलतोय, ज्यामुळे ५ षटकार कमी बसले असते. जर आम्ही नियोजनानुसार अचूक चेंडू टाकले असते, तर आम्ही नक्कीच सामन्यात राहिलो असतो. पण जसं मी सांगितलं, त्यांच्या सलामीवीरांनी काही षटकांमध्येच आमच्यावर दबाव टाकून आम्हाला सामन्याबाहेर ढकललं. त्यानंतर आम्ही सतत पाठलाग करत राहिलो आणि शेवटी कमी पडलो.”

वैभव सूर्यवंशीबद्दल हार्दिक म्हणाला, “१६-१७ वर्षांचा मुलगा आहे आणि तो ज्या पद्धतीने खेळला, ते पाहणं खरंच आश्चर्यकारक आहे. सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली होती. त्याची फलंदाजी, त्याचा निर्भयपणा आणि त्याचे फटके खूपच प्रभावी आहेत. त्याच्या भविष्यासाठी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो.”

आरसीबीविरूद्धच्या पुढील सामन्याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, “फक्त चुका समजून घ्यायच्या. उद्या पुन्हा एक नवी सकाळ होईल. त्यामुळे आपल्या चुका सुधारून पुढील सामन्यासाठी चांगली तयारी करायची.”