Hardik Pandya On Mumbai Indians Defeat: मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे आणि पंजाब किंग्सला मात्र विजयाची जणू सवय झाल्याचं चित्र दिसत आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला एकतर्फी सामन्यात सात गडी राखून पराभूत केलं. १९५ धावांचा डोंगर उभा करूनही मुंबईला सामना गमवावा लागला. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी मधल्या षटकांमध्ये १३९ धावांची भागीदारी करत १६.३ षटकांत सामना जिंकला. सलग चौथ्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार काय म्हणाला, जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि क्विंटन डीकॉक व नमन धीरच्या खेळीच्या बळावर संघाने १९५ धावांचा डोंगर उभारला. क्विंटन डी कॉकने ११२ धावांची तर नमन धीरने ५० धावांची खेळी केली. याशिवाय मुंबईचे इतर फलंदाज अपयशी ठरले. तर गोलंदाजीत अल्लाह गझनफरने २ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली. याशिवाय मुंबईचे दीपक चहर, जसप्रीत बुमराह हे गोलंदाज अपयशी ठरले.
मुंबई इंडियन्सच्या संघातील वरिष्ठ खेळाडू फॉर्मात नसल्याचा फटका संघाला बसत आहे. याशिवाय हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पंड्या ज्या पद्धतीने गोलंदाजांचा वापर करत आहे, त्यावर कॉमेंट्रीदरम्यान दिग्ग्जदेखील विचारणा करत आहेत. तर जसप्रीत बुमराह, दीपक चहर, हार्दिक पंड्या व ट्रेंट बोल्टसारखे गोलंदाज आपल्या फॉर्मात नसल्याने गोलंदाजीत संघाला जबर फटका बसत आहे.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला?
हार्दिक पंड्या मुंबईच्या पराभवानंतर म्हणाला, “खरं सांगायचं तर, आत्ता माझ्याकडे फार काही बोलण्यासारखं नाही. आम्हाला पुन्हा एकदा सुरुवातीपासून विचार करून पाहावं लागेल की आपण नेमकं कुठे कमी पडतोय. व्यक्तिगत पातळीवर, संघ म्हणून की नियोजनात? हे सगळं आम्ही समजून घेऊ आणि पुढे काय करता येईल ते ठरवू.”
“त्यांनाही (पंजाब किंग्सला) श्रेय द्यायलाच हवं. दुसऱ्या डावात चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला. दरम्यान दव पडल्यामुळे थोडी परिस्थिती सुधारली, पण तरीही त्यांनी आम्हाला पूर्णपणे मागे टाकलं. त्यांनी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच बाबतीत आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आणि हे आम्हाला पुन्हा विचार करायला भाग पाडतं,” असं हार्दिक पंड्या म्हणाला.
मुंबई इंडियन्स संघात पुढील सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत देत पुढ हार्दिक म्हणाला, “आता आम्हाला ठरवावं लागेल की काही कठीण निर्णय घ्यायचे का, की सध्या जे आहे तेच सुरू ठेवून परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची. हे काही कठोर प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं आम्हाला शोधावीच लागतील. आणि हो, याची जबाबदारीही घ्यावी लागेल.”
