Hardik Pandya Statement on MI Defeat: मुंबई इंडियन्सने १३ वर्षांनी आयपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकला. पण यानंतर संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर आरसीबीने १८ धावांनी पराभवाचा दणका दिला. मुंबईचा संघ या सामन्यात गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये फेल ठरल्याचं पाहायला मिळालं. संघाच्या पराभवाच्या हॅटट्रिकनंतर कर्णधार हार्दिक पंड्याने संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यानंतर आरसीबीच्या टॉप-५ फलंदाजांनी वादळी फटकेबाजी करत २४० धावांचा डोंगर उभारला. पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. तर मधल्या षटकांमध्ये बुमराह, बोल्ट हे मोठे गोलंदाज विकेट्स घेऊ न शकल्याचा संघाला चांगला फटका बसला. याशिवाय रोहित रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मधल्या फळीनेही जबाबदारी घेऊन फलंदाजी केली नाही, ज्याचा फटका पराभवाने संघाला बसला.

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

हार्दिक पंड्या पराभवानंतर म्हणाला, “हो आम्ही खूप विकेट्स गमावल्या आणि त्याच वेळी आम्ही पहिल्या डावात खूप जास्त धावाही दिल्या. त्यामुळे सामन्यात आम्ही पुनरागमनच करू पाहत होतो. मागील काही सामन्यांमध्ये, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, आम्ही खेळावर नियंत्रण ठेवण्याऐवजी सातत्याने सामन्यात परत येण्याच्या प्रयत्नात होतो.”

“आता आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आपण काय चांगलं करू शकतो आणि संघाला आवश्यक असलेली गती व लय कशी मिळवू शकतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता आमच्याकडे काही दिवसांचा ब्रेक आहे, त्यानंतर पुन्हा सामना आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर, आता अनेक गोष्टी नव्याने विचार करण्याची गरज आहे. सध्या काही गोष्टी आमच्या मनासारख्या होत नाहीत,” असं हार्दिक पुढे म्हणाला.

नाणेफेकीचा निर्णय चुकला का, त्याबाबत बोलताना मुंबईचा कर्णधार म्हणाला, “काही सामन्यांमध्ये आम्ही नाणेफेक जिंकली, पण कदाचित फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये इतर पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. खेळपट्टी कशी आहे हे पाहता, जर आम्ही चांगली फलंदाजी केली तर ते आमच्यासाठी फायद्याचं ठरेल. एकंदरीत, आम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते जमलं, तर नाणेफेकीचा परिणाम काहीही असो, आम्ही योग्य तो निकाल मिळवू शकतो.”

“सध्या आमचं मुख्य लक्ष आहे की सुरुवातीच्या षटकांत (पॉवरप्लेमध्ये) लय कशी मिळवायची. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आम्ही तिथेही मागे पडत आहोत. त्यामुळे विविध पर्यायांचा विचार केला जाईल आणि पुढच्या सामन्यात काय बदल करता येतील ते पाहू,” हार्दिकने सलग तिसऱ्या पराभवानंतर बोलताना संघामधील बदलाचे संकेत दिले आहेत.

रूदरफोर्डच्या ७१ धावांच्या उत्कृष्ट खेळीबाबत हार्दिक म्हणाला, “रदरफोर्डला संघात घेतल्यावर आम्ही खूप उत्सुक होतो. त्याच्यातील क्षमता आणि ताकद आम्हाला माहित होती. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळे संघात काही बदल करायचे असतील किंवा संघाच्या गरजेनुसार निर्णय घ्यायचे असतील, तर ते करण्यासाठी आम्हाला अधिक मोकळीक मिळते.” मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता १६ एप्रिलला गुरूवारी पंजाब किंग्सविरूद्ध आहे.