पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी मात देत ही मालिका 2-1 अशी नावाववर केली. सुरुवातील सोपा वाटणारा हा सामना इंग्लंडच्या सॅम करनमुळे रंगतदार स्थिती पोहोचला होता. या सामन्यात भारताने क्षेत्ररक्षण करताना अनेक चुका केल्या. सामन्याच्या मोक्याच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी काही महत्त्वाचे झेलही सोडले. तरीही, भारताने आशा न सोडता हा सामना जिंकला. यादरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोईन अलीचा अद्भूत झेल घेत सर्वांना खूष केले.

 

इंग्लंडच्या फलंदाजीच्या 31व्या षटकात हार्दिकने हा झेल घेतला. भूवनेश्वर कुमारने टाकलेल्या चेंडूवर मोईनने मि़डऑफच्या दिशेने चेंडू टोलवला. त्यावेळी हार्दिकने धावत येत आणि सूर मारत हा झेल टिपला. मोईन अली 25 चेंडूत 29 धावांवर बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर पंड्याचा हा झेल पांड्याचा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. पांड्याने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत एकूण 100 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 144पेक्षा जास्त होता.

असा झाला तिसरा सामना

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी सरशी साधली. या विजयासह कोहली ब्रिगेडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.