Hardik Pandya Thank Shardul Thakur Video: मुंबई इंडियन्स संघाने १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलमधील सलामीचा सामना जिंकला. मुंबई इंडियन्स कायम पहिली मॅच देवाला देते, हा बट्टा संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये पुसून टाकला. शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांची कामगिरी सामन्यात गेमचेंजर ठरली. तर लॉर्ड ठाकूरच्या गोलंदाजीसमोर केकेआरची वरची फळी फारश्या धावा करू शकली नाही. सामन्यानंतरचा एक व्हीडिओ आयपीएलने शेअर केला आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरचे आभार मानत आहे.
अजिंक्य रहाणे आणि फिन एलन या केकेआरच्या सलामी जोडीने पॉवरप्लेमध्ये कमालीची फटकेबाजी केली. या दोघांनी ५ षटकांत ६९ धावा कुटल्या. यानंतर लॉर्ड शार्दूल ठाकूरकडे पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन एलन झेलबाद झाला. यानंतर स्पेलमधील पुढच्या षटकात त्याने कॅमेरून ग्रीनला माघारी धाडलं. यानंतरही कर्णधार अजिंक्य रहाणे एकटा केकेआरचा डाव सांभाळत होता. शार्दुल १४व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने अजिंक्यला माघारी धाडत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली.
शार्दुल ठाकूरने त्याच्या स्पेलमधील सलग ३ षटकांत ३ विकेट्स घेतल्या. जिथे मुंबई इंडियन्सचे सर्व गोलंदाज फेल ठरत होते, तिथे एकट्या शार्दुलने केकेआरची वरची फळी उद्धवस्त केली. शार्दुलने या सामन्यात ४ षटकांत ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हार्दिकनेही सामन्यानंतर शार्दुलचं कौतुक केलं आणि त्याला सांगितलं की त्याने त्याचं उर्वरित करियर मुंबई इंडियन्समध्ये राहावं.
हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरला नेमकं काय म्हणाला?
आयपीएलने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये शार्दुल त्याच्या या कामगिरीबाबत आणि मुंबईकडून खेळताना कसं वाटतंय, याबाबत बोलताना दिसत आहे. या व्हीडिओच्या सुरूवातीला शार्दुल बोलत असताना मागून हार्दिक जात असतो आणि तितक्यात तो थांबतो शार्दुलच्या खांद्यावर हात ठेवतो म्हणतो, “माय लॉर्ड ही अपयशाची मालिका तोडल्याबद्दल तुला खूप थँक्यू, आय लव्ह यू.”
