Why Hardik Pandya Tim David Fined: आयपीएल २०२६ चा २०लवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुहेरी धक्का बसला. या सामन्यानंतर आरसीबीचा खेळाडू टिम डेव्हिडलाही शिक्षा झाली. नियमित वेळेनुसार हा सामनाही बराच काळ चालला. आयपीएलकडून या दोन्ही खेळाडूंना का शिक्षा ठोठावण्यात आली, जाणून घ्या.
आयपीएलच्या नियमांनुसार, सोमवारी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरूद्ध आरसीबीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि यासह संघाने पहिल्या डावात २४० धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल मुंबईचा कर्णधार दोषी आढळला आणि त्याला दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, आरसीबीचा फलंदाज टिम डेव्हिडलाही शिक्षा झाली आहे.
टीम डेव्हिड-हार्दिक पंड्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात आली?
टिम डेव्हिड आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्याला त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला असून एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.४ अंतर्गत डेव्हिड दोषी आढळला. हे कलम खेळाडू पंचांच्या निर्णयाचा अनादर करण्याशी संबंधित आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात डेव्हिडने ही घटना दोन वेळा केल्याने त्याला अखेरीस दंड ठोठावण्यात आला.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात टिम डेव्हिडने दोनदा पंचांच्या निर्णयाचा अनादर केला. सुरूवातीला, १८ व्या षटकात (१७.२) त्याने वारंवार तपासणीसाठी चेंडू हातात धरून ठेवला. पंचांनी वारंवार विनंती करूनही त्याने चेंडू पंचांकडे देण्यास नकार दिला. त्यानंतर, २० व्या षटकातदेखील (१९.२), वारंवार विनंती करूनही त्याने पुन्हा चेंडू देण्यास नकार दिला. पंच डेव्हिडला यादरम्यान खडसावताना दिसले, पण तरीही त्यांना पंचांना जुमानलं नाही.
यामुळे टीम डेव्हिडला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. सामनाधिकाऱ्यांनी टीम डेव्हिडवर आरोप केले आणि डेव्हिडने ते मान्यदेखील केली. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल दोषी आढळला. या हंगामातील स्लो ओव्हर रेटमुळे दोषी आढळल्याची पहिलीच वेळ होती. कर्णधार पंड्याला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत १.२ दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
