संदीप द्विवेदी, देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस
Hardik Pandya Set to lose Mumbai Indians Captaincy: हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम फार वाईट ठरला. संघाने स्पर्धेतील १४ पैकी १० सामने गमावले, शिवाय संघाला स्पर्धेतून लवकर बाहेर पडावं लागलं. पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेला मुंबईचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने अपयशी ठरत आहे. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पxड्याचा कार्यकाळ आता संपण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. आयपीएल २०२६ मध्ये १४ पैकी १० सामने गमावून संघ नवव्या स्थानावर राहिला आणि सलग सहाव्या वर्षी जेतेपद हुकल्यामुळे मुंबई इंडियन्स आता संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरुवात कर्णधारपदापासून होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील किमान तीन व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिककडून कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर संघातील त्याच्या स्थानाबाबतही चर्चा होऊ शकते.
“संपूर्ण हंगामात असे अनेक संकेत मिळाले की टीम मॅनेजमेंट त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवण्याच्या बाजूने नाही. संघामध्ये याबाबत स्पष्ट चर्चा सुरू आहे,” असं एका सूत्राने सांगितलं. या घडामोडींची पार्श्वभूमी म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर प्रशिक्षकांनी घेतलेली टीम मीटिंग.
“प्रशिक्षकांनी वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ते कुठेही खेळत असले तरी कोचच्या सूचनांनुसार वागणं गरजेचं आहे. अनेक वेळा डेटा आणि विश्लेषणाच्या आधारे प्रशिक्षकांनी काही सूचना दिल्या, मात्र खेळाडूंनी त्या पाळल्या नाहीत,” असंही सूत्रांनी सांगितलं.
मुंबई इंडियन्सचा पुढील मार्ग काय?
“येत्या काही दिवसांत संघात गंभीर आत्मपरीक्षण आणि चर्चा केली जाईल. प्रत्येक पर्यायाचा सखोल विचार होईल. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. पुढे जाताना, हार्दिक पंड्या कर्णधारपदी कायम राहू शकतो का? की तो संघात केवळ एक खेळाडू म्हणून खेळेल? यावर चर्चा होईल.” अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सच्या एका जुन्या सदस्याने दिली आहे.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारांची विजयाची टक्केवारी
हार्दिक पंड्याने ३७ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्तव केलं असून १५ सामने जिंकले आहेत आणि २२ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यासह त्याची विजयाची टक्केवारी ४०.५४ टक्के आहे. तर ५ आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्माने १६३ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्त्व केलं असून ९१ सामने जिंकले आहेत आणि ६८ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला, यासह रोहित शर्माची विजयाची टक्केवारी ५५.८२ टक्के आहे. तर ५५ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्तव करणाऱ्या सचिन तेंडुलकरची विजयाची टक्केवारी ५८.१८ टक्के आहे. तर शॉन पोलॉकची विजयाची टक्केवारी ४६.६७ टक्के होती.
समस्या केवळ कर्णधारपदाची नाही…
संघातील अंतर्गत सूत्रांच्या मते, अडचण केवळ कर्णधारपदापुरती मर्यादित नाही. या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला इतर यशस्वी संघांप्रमाणे ‘पॉवरप्ले’चा प्रभावी वापर करता आला नाही. थोडक्यात सांगायचं तर, संघ बदलत्या काळासोबत आणि आधुनिक टी-२० क्रिकेटच्या गतीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला.
मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूला या हंगामात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत स्थान मिळवता आलं नाही. रायन रिकलटन संघातील सर्वोत्तम फलंदाज असूनही सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो थेट १७व्या स्थानावर आहे. तर अल्लाह गझनफर मुंबईचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज असला तरी यादीत १४व्या स्थानावर आहे. संघात प्रत्येक वळणावर सामना फिरवण्याची ताकद असलेले खेळाडू असूनही त्यांची स्पर्धेतील कामगिरी मात्र अनाकलीय आहे.
हार्दिक आणि मुंबईच्या चाहत्यांचं नातं नेहमीच गुंतागुंतीचं राहिलं आहे. मुंबई इंडियन्सने हुडकलेला हार्दिक, २०२२ मध्ये फ्रँचायझीपासून वेगळा झाला आणि गुजरात टायटन्समध्ये गेला. गुजरातबरोबर कर्णधार म्हणून त्याने ट्रॉफी पटकावली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माची जागा घेण्यासाठी मुंबई इंडियन्समध्ये परतला.
रोहितने भारताला ५० षटकांच्या विश्वचषक फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हे घडलं होतं. चाहत्यांना हे कधीच पचनी पडलं नाही. तो परतलेल्या पहिल्या हंगामात, जेव्हा मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सर्वात शेवटी राहिली, तेव्हा चाहत्यांनी त्याची हुर्याे उडवली होती. २०२५ मधील अंशतः सुधारणेने आशा वाढवल्या होत्या. मात्र, २०२६ च्या हंगामाने त्यावर पूर्णपणे पाणी फेरलं. मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि निर्णय घेणारे अधिकारी सध्या विश्रांती घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यांत जेव्हा ते पुन्हा एकत्र येतील, तेव्हा गंभीर चर्चा होईल. हार्दिक संघाचे नेतृत्व करेल, संघात खेळाडू म्हणून खेळेल की यापैकी काहीच होणार नाही, अद्याप काहीही ठरलेलं नाही.
