Hardik Pandya IPL Race: भारताचा अष्टपैलू खेळाडू व आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुढील सीझनपूर्वी मुंबईचा संघ रिलीज करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिकला ‘ट्रेड’ (अदलाबदल) केलं जाऊ शकतं आणि आगामी हंगामात तो दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आयपीएल २०२६ संपल्यानंतर मुंबई आणि हार्दिक यांच्याकडून मिळणारे संकेत या चर्चांना दुजोरा देत आहेत. आता हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेण्यासाठी सात फ्रँचायझी उत्सुक आहेत.

अनेक फ्रँचायझी हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करून घेण्यास उत्सुक आहेत; एका अहवालानुसार, मुंबई वगळता उर्वरित नऊपैकी सात फ्रँचायझींनी हार्दिकला करारबद्ध करण्यात रस दाखवला आहे. यामध्ये आता चेन्नई सुपर किंग्स संघदेखील सामील झाला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांशिवाय इतर सात फ्रँचायझी हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेण्यास उत्सुक आहेत. या यादीत चेन्नई सुपर किंग्सचाही समावेश झाला आहे; कारण गेल्या आठवड्यापर्यंत त्यांनी हार्दिकला करारबद्ध करण्यात कोणताही रस नसल्याचं सांगत या गोष्टीला नकार दिला होता.

आता असा दावा केला जात आहे की चेन्नई सुपर किंग्सदेखील ही फ्रँचायझी विकत घेऊ शकते. असे असले तरी, हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हेच सर्वाधिक उत्सुक आहेत. दोन्ही फ्रँचायझी त्याला कर्णधारपद सोपवण्यासही तयार आहेत; विशेषतः केकेआरला (KKR) कर्णधाराची अत्यंत गरज आहे. राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी रियान परागच्या खांद्यावर आहे, पण हार्दिक जर संघात सामील झाला तर त्याला नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल.

चेन्नईला हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेण्यात रस आहे, परंतु ते त्याला नेतृत्त्वाची संधी देण्याची हमी देणार नाहीत. सध्या त्यांच्याकडे ऋतुराज गायकवाड कर्णधार म्हणून आहे. संजू सॅमसन हा देखील एक पर्याय आहे; आयपीएल २०२६ पूर्वी सीएसकेने (CSK) रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात ‘ट्रेड’द्वारे राजस्थानकडून संजूला आपल्या संघात घेतलं होतं. त्यावेळी संजूला कर्णधारपदाबाबत कोणतही आश्वासन देण्यात आलं नव्हतं.

हार्दिक पंड्या चेन्नई संघात सामील होण्यामागे मोठं कारण असू शकतं ते म्हणजे एम एस धोनी. धोनी व हार्दिक पंड्या यांचं बॉन्डिंग कमाल आहे. हार्दिकने अनेकदा धोनीचं नेहमीच कौतुक केलं आहे. रांचीमध्ये हार्दिक अनेकदा धोनीच्या घरी जाऊनदेखील राहिला आहे. धोनी गेल्या हंगामात दुखापतीमुळे खेळताना दिसला नव्हता. त्यामुळे हार्दिकच्या रूपात सीएसकेला केवळ एक अष्टपैलू खेळाडूच नाही, तर धोनीची जागा घेऊ शकणारा एक ‘फिनिशर’ही मिळेल; शिवाय, त्यांच्या नेतृत्वाचा गटही अधिक बळकट होईल.